फेसबुकवरून ओळख, मैत्री अन् शारीरिक सुखाची मागणी; नकार देताच कास्टिंग डायरेक्टरने फोडलं मुलीचं डोकं
आरोपी दीपक मालाकारशी तिची गेल्या वर्षी फेसबुकवरून ओळख झाली. जवळपास दोन महिन्यांपूर्वी त्याने पीडितेच्या कुटुंबीयांसमोर तिच्याशी लग्न करण्याची मागणी घातली होती. तरुणीच्या कुटुंबीयांनी त्याला लग्नासाठी परवागनी दिली आणि त्यांच्या घरात राहण्यासाठीही जागा दिली होती.
मुंबई | 17 ऑगस्ट 2023 : फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊचच्या अनेक धक्कादायक घटना वारंवार ऐकायला मिळतात. नवोदित कलाकारांपासून ते मोठमोठ्या सेलिब्रिटींनीही त्यांच्यासोबत घडलेल्या कास्टिंग काऊचच्या घटनांचा खुलासा केला आहे. नुकतीच मुंबईत अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. मुंबईतल्या एका कास्टिंग डायरेक्टरने 18 वर्षांच्या मुलीसोबत हे वाईट कृत्य केलं आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीत आपली ओळख बनवण्यासाठी ही मुलगी स्वप्नांची नगरी मुंबईत आली होती. मात्र संबंधित कास्टिंग डायरेक्टरने तिला आपल्या जाळ्यात अडकवलं आणि तिच्यासोबत गैरवर्तणुकीचा प्रयत्न केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्या मुलीने प्रतिकार करताच कास्टिंग डायरेक्टरने तिचं डोकं फोडलं. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
या कास्टिंग डायरेक्टरची ओळख पटली असून तो मूळचा बिहारचा आहे. दीपक मालाकार असं त्याचं नाव असून तो 26 वर्षांचा आहे. गेल्या काही वर्षांपासून तो मुंबईत राहत आहे. दीपकची त्या मुलीशी ओळख फेसबुकद्वारे झाल्याचं म्हटलं जात आहे. ते दोघं लग्नही करणार होते, असंही कळतंय. दीपक संबंधित मुलीसोबत मुंबईतील एका 1 बीएचके फ्लॅटमध्ये राहत होता. दीपकने तिला एका मित्राच्या पार्टीमध्ये नेलं आणि तिथे तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.
मुलीने प्रतिकार करताच त्याने तिच्यावर हल्ला केला आणि तिचं डोकं भिंतीला आपटलं. मुलीच्या कपाळातून रक्त येऊ लागलं आणि ती बेशुद्ध झाली. त्यामुळे तिचा मृत्यू झाला असं दीपकला वाटलं होतं. असा विचार करून त्याने तिला खोलीत बंद केलं आणि बाहेरून टाळा लावला. या घटनेनंतर त्याने मुंबईतून पळ काढला आणि मोबाइल फोनसुद्धा स्विच ऑफ केला. दीपक लोकल बूथवरून कॉल करून सतत मित्रांच्या संपर्कात होता. अखेर पोलिसांनी त्याचा पत्ता ट्रॅक केला आणि त्याला अटक केली.
शुद्धीवर आल्यानंतर मुलीने इतरांच्या मदतीने पोलिसांत तक्रार दाखल केली. दोन दिवस तिच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. संबंधित पीडित तरुणी ही फर्स्ट इअर विद्यार्थी असल्याचं कळतंय. आरोपी दीपक मालाकारशी तिची गेल्या वर्षी फेसबुकवरून ओळख झाली. जवळपास दोन महिन्यांपूर्वी त्याने पीडितेच्या कुटुंबीयांसमोर तिच्याशी लग्न करण्याची मागणी घातली होती. तरुणीच्या कुटुंबीयांनी त्याला लग्नासाठी परवागनी दिली आणि त्यांच्या घरात राहण्यासाठीही जागा दिली होती. यावेळी दीपकने अनेकदा पीडितेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता.