हिरोला सोडून मोना सिंहने निर्मात्याशी का केलं लग्न? 5 वर्षांनंतर केला खुलासा
अभिनेत्री मोना सिंह तिच्या खासगी आयुष्याविषयी फार क्वचित व्यक्त होते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती पहिल्यांदाच तिच्या लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. यामध्ये तिने अभिनेता नव्हे तर निर्मात्याशी लग्न करण्यामागचं कारण सांगितलं आहे.
‘जस्सी जैसी कोई नहीं’ या मालिकेतून अभिनेत्री मोना सिंह घराघरात पोहोचली. या मालिकेनंतर तिने इतरही मालिकांमध्ये काम केलं आणि त्यानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आमिर खानच्या ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटात तिने अभिनेत्री करीना कपूरच्या बहिणीची भूमिका साकारली होती. नुकतीच ती आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंज्या’ या चित्रपटात झळकली होती. कमी बजेटच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली आहे. आपल्या दमदार अभिनयकौशल्यामुळे चर्चेत असलेली मोना तिच्या खासगी आयुष्याविषयी फारशी व्यक्त होत नाही. 27 डिसेंबर 2019 रोजी तिने निर्माता श्याम राजगोपालनशी लग्न केलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती तिच्या जोडीदाराविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. त्याचप्रमाणे अभिनेत्याशी लग्न न करता निर्मात्याशी का केलं, यामागचंही तिने कारण सांगितलं आहे.
मोना सिंहने 2003 मध्ये ‘जस्सी जैसी कोई नहीं’ या पहिल्यावहिल्या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळवली. अभिनय क्षेत्रात बरीच वर्षे काम केल्यानंतर मोनाचं नाव इंडस्ट्रीतील एका अभिनेत्याशी जोडलं गेलं होतं. मात्र 2019 मध्ये तिने निर्मात्याशी लग्न करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. आता आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत मोनाने सांगितलं, “कदाचित मी कोणत्या अभिनेत्याला कधीच सांभाळून घेऊ शकणार नाही. ते बरेच उत्कट (ऑब्सेसिव्ह) असतात. मी तशी नाहीये. पण काही लोक तसे असतात. मला या गोष्टीचा आनंद आहे की मी आणि माझा पती एकाच इंडस्ट्रीतले आहोत. तो जाहिरातींच्या क्षेत्रात काम करतो, अभिनयक्षेत्रात नाही.”
View this post on Instagram
मोनाचा पती श्याम राजगोपालन एक निर्माता, दिग्दर्शक असून तो थिएटरसुद्धा मॅनेज करतो. डिसेंबर 2019 मध्ये या दोघांनी मुंबईतील जुहू मधल्या मिलिटरी क्लबमध्ये लग्न केलं. मोना पंजाबी असल्याने त्यांचं लग्न शिख विवाहपद्धतीनुसार पार पडलं होतं. मोनाचा पती दाक्षिणात्य आहे. मोनाच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, ती नुकतीच ‘मुंज्या’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. यामध्ये तिने शर्वरी वाघ, अभय वर्मा, भाग्यश्री लिमये, सुहास जोशी यांच्यासोबत काम केलं. या चित्रपटात तिने अभय वर्माच्या आईची भूमिका साकारली होती.