आता मोठ्या पडद्यावर रंगणार कुस्तीचा थरार, खाशाबा जाधव यांच्यांवर चित्रपट
भारत सरकारने खाशाबा यांना कुस्तीमधील योगदानाबद्दल मरणोत्तर अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले. २०१० च्या दिल्ली कॉमनवेल्थ गेम्ससाठी नव्याने बांधलेल्या कुस्ती स्थळाला त्यांचे नाव देण्यात आले.
कोल्हापूर : क्रीडाक्षेत्रात दैदीप्यमान कामगिरी करणाऱ्यावर अनेक खेळाडूंवर चित्रपट आले आहेत. त्या चित्रपटांना चांगले यशही मिळाले. सचिन तेंडुलकर यांच्यांवर सचिन अ बिलियन ड्रीम्स, महेंद्रसिंह धोनी यांच्यांवर एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी, कपिलदेव यांच्यावरील 83 हे चित्रपट यशस्वी ठरले. त्यानंतर भाग मिल्खा भाग हा मिल्खासिंगवरील चित्रपटानेही चांगले यश मिळवले. हॉकीवर चक दे इंडिया, मेजर धान्यचंद यांच्या जीवनावरील चित्रपट तुफान चालला. क्रीडा क्षेत्रावरील यश मिळवणाऱ्या चित्रपटांमध्ये मराठमोळ्या व्यक्तीमत्वावरील चित्रपटाची भर पडणार आहे.
खाशाबा जाधव यांच्यांवर चित्रपट
कुस्तीमध्ये देशाला पहिले ऑलम्पिक पदक मिळवून देणाऱ्या खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील उमळवाडमध्ये महाशिवरात्री यात्रेनिमित्त भव्य कुस्त्यांची स्पर्धा आयोजित केली होती. यावेळी चित्रपट निर्माते नागराज मंजुळे यांची उपस्थिती होती.
कुस्तीमध्ये देशाला पहिले ऑलम्पिक पदक मिळवून देणाऱ्या आणि जागतिक दर्जाचे पैलवान राहिलेल्या खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याची घोषणा चित्रपट निर्माते नागराज मंजुळे यांनी केलीय. यावेळी माजी आरोग्य राज्यमंत्री आ.राजेंद्र पाटील यड्रावकर, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे मंगेश चिवटे उपस्थित होते.
खाशाबा जाधव कोण आहेत
देश स्वतंत्र झाल्यानंतर क्रीडा क्षेत्रात ज्यांनी भारताची प्रतिमा उंचावली अशी दोन व्यक्तिमत्व. त्यातील एक हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद आणि दुसरे कुस्तीतले पैलवान खाशाबा जाधव. मराठमोळ्या खाशाबांचं आयुष्य काही कमी प्रेरणादायी नाही. ऑलिम्पिकमध्ये स्वतंत्र भारताला पहिलं वैयक्तिक मेडल मिळवून देण्याचा मान त्यांच्याकडे जातो.
खाशाबा यांच्या आधीच्या वर्षांमध्ये भारत हॉकी या सांघिक खेळात सुवर्णपदक जिंकत होता. खाशाबा जाधव यांनी १९४८ मध्ये लंडन उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये फ्लायवेट वजनगटातील कुस्तीत सहावा क्रमांक मिळवला. त्यानंतर १९५२ मध्ये हेलसिंकी उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये ५२ किलोग्रॅम वजनगटात फ्रीस्टाइल प्रकारांतर्गत कांस्यपदक जिंकले.
अर्जुन पुरस्कार अन् गूगलकडून सन्मान
भारत सरकारने खाशाबा यांना कुस्तीमधील त्यांच्या योगदानाबद्दल मरणोत्तर अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले. २०१० च्या दिल्ली कॉमनवेल्थ गेम्ससाठी नव्याने बांधलेल्या कुस्ती स्थळाला त्यांचे नाव देण्यात आले. १५ जानेवारी रोजी गूगलने खाशाबा जाधव यांना त्यांच्या जयंतीनिमित्त गूगल डूडलद्वारे सन्मानित केले.
चित्रपटातून थरार
खाशाबा जाधव यांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग आणि कुस्तीचा थरार चित्रपटामधून दिसणार आहे. फँड्री, सैराट, झुंड या चित्रपटांचे दिग्दर्शक नागराज मंजुळे खाशाबा जाधव यांच्यांवर चित्रपटाची निर्मिती करणार आहे.