नागराज मंजुळे, सयाजी शिंदे यांनी घेतली चंद्रपूर पोलिसांची भेट; नेमकं काय आहे प्रकरण?
हा एक ॲक्शन चित्रपट असला तरी त्यात कौटुंबिक कथा आणि प्रेमकहाणीसुद्धा आहे. आतापर्यंत या चित्रपटातील तीन गाणी प्रदर्शित झाली असून त्यांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
चंद्रपूर : ‘सैराट’ या चित्रपटामुळे देशभरात ख्याती मिळवणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि अभिनेते सयाजी शिंदे यांनी नुकतीच चंद्रपूर पोलिसांची भेट घेतली. यावेळी दोघांनी नक्षलवाद्यांशी स्वत: दोन हात केलेल्या चंद्रपूरमधील C 16 बटालियनच्या पोलिसांशी संवाद साधला. नागराज यांचा आगामी ‘घर बंदूक बिरयानी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्ताने नागराज मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर, सायली टीम अशी चित्रपटाची टीम महाराष्ट्र दौरा करत आहे. घर बंदूक बिरयानी या चित्रपटाचा ट्रेलर पाहताना बटालियनने खूप मजा केली. टाळ्या आणि शिट्ट्यांच्या आवाजात त्यांनी नागराज आणि सयाजी शिंदे यांचं स्वागत केलं. या चित्रपटात नागराज अस्सल मातीतला, तडफदार पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहेत.
घर बंदूक बिरयानी या चित्रपटाचं दिग्दर्शन हेमंत अवताडे यांनी केलंय. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. यामध्ये नागराज मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि सायली पाटील यांच्या मुख्य भूमिका आहेत. आशेच्या भांगेची नशा.. अशी या चित्रपटाची टॅगलाइन आहे. ट्रेलरमध्ये पोलीस, डाकू यांच्यातील चकमक पहायला मिळते. त्यात एका तरुणाचाही सहभाग असतो. त्यांच्यात ही चकमक का सुरू आहे आणि घर, बंदूक, बिरयानीचा त्याच्याशी नेमका संबंध काय, याचं उत्तर प्रेक्षकांना येत्या 7 एप्रिल रोजी मिळणार आहे.
या चित्रपटात नागराज मंजुळे ॲक्शन मोडमध्ये तर सयाजी शिंदे अत्यंत रावडी आणि तडफदार अंदाजात दिसत आहेत. आकाशची रोमँटिक इमेज तरुणांना भावणारी आहे. हा एक ॲक्शन चित्रपट असला तरी त्यात कौटुंबिक कथा आणि प्रेमकहाणीसुद्धा आहे. आतापर्यंत या चित्रपटातील तीन गाणी प्रदर्शित झाली असून त्यांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
या चित्रपटाविषयी नागराज मंजुळे म्हणाले, “हा खूप ओळखीचा विषय दिसत असला तरी त्याची कथा वेगळी आहे. मी पडद्यामागे आणि पडद्यावरही काम केलंय. अनेकांना प्रश्न पडलेला की या चित्रपटाचं नाव काय असेल? घर, बंदूक, बिरयानी हे नाव अत्यंत समर्पक असून त्याची प्रचिती प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच येईल. यात काही मुरलेले तर काही नवोदित कलाकार आहेत. पण सर्वांनीच जीव ओतून काम केलंय.”