Naseeruddin Shah | “पुजाऱ्यांनी घेरून असे येतात जणू इंग्लंडचे राजाच..”; नसीरुद्दीन शाह यांचा मोदींवर निशाणा
केवळ चित्रपटांबद्दलच नाही तर विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर ते खुलेपणाने आपली मतं मांडताना दिसतात. एका मुलाखतीत त्यांनी नव्या संसद भवनावर प्रतिक्रिया देताना मोदींवर निशाणा साधला आहे.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नव्या संसद भवनाचं उद्घाटन केलं. या नव्या संसद भवनाच्या उद्धाटन सोहळ्यावर काँग्रेससह 20 विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. या संसद भवनावरून गेल्या काही दिवसांपासून वादंग सुरू आहे. आता ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. नसीरुद्दीन हे त्यांच्या दमदार अभिनयासोबतच बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. केवळ चित्रपटांबद्दलच नाही तर विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर ते खुलेपणाने आपली मतं मांडताना दिसतात. गेल्या काही दिवसांपासून ते ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत. आता आणखी एका मुलाखतीत त्यांनी नव्या संसद भवनावर प्रतिक्रिया देताना मोदींवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले नसीरुद्दीन शाह?
“जुन्या संसद भवनाची इमारत 100 वर्षे जुनी होती, म्हणून नव्या इमारतीची गरज होती. पण अशा उद्घाटन सोहळ्याची गरज होती का? तुम्ही प्रत्येक गोष्टीत धार्मिक पैलूंना सहभागी करत आहात. तुम्ही अशा पद्धतीने पुजाऱ्यांनी घेरून येता जसं की ते इंग्लंडचे राजे आहेत आणि त्यांच्याभोवती बिशपांचा घोळका आहे. तुम्ही राजदंड घेऊन येता. भव्यतेच्या भ्रमाची एक मर्यादा असली पाहिजे. मला असं वाटतं की त्याचे परिणाम आम्ही भोगतोय”, असं ते म्हणाले. “मोदी सरकारद्वारे नव्या संसद भवनाचं उद्घाटन हे अत्यंत चलाखीने खेळला गेलेला पत्ता आहे. या पत्त्याने आपलं काम केलंय. बघुयात केव्हापर्यंत काम सुरू राहील”, अशा शब्दांत त्यांनी मोदींना सुनावलं आहे.
‘द केरळ स्टोरी’बद्दल काय म्हणाले?
सुदिप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ने आतापर्यंत भारतात 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त गल्ला जमवला आहे. मात्र चित्रपटाच्या या यशाला नसीरुद्दीन यांनी ‘धोकादायक ट्रेंड’ असं म्हटलं होतं. “भीड, अफवाह, फराझ यांसारखे दमदार चित्रपट फ्लॉप ठरले. कोणीच ते चित्रपट बघायला गेलं नाही. पण द केरळ स्टोरीसाठी लोक गर्दी करत आहेत. तो चित्रपट मी पाहिला नाही आणि पाहण्याची माझी इच्छाही नाही. कारण त्याबद्दल मी पुरेसं वाचलं आहे”, असं ते म्हणाले होते.