National Awards : आलिया मंचावर राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना रणबीरने केलेली ‘ही’ खास गोष्ट चर्चेत
नवी दिल्लीत नुकताच 69 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा पार पाडला. या पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री आलिया भट्टला 'गंगुबाई काठियावाडी' या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नवी दिल्ली | 17 ऑक्टोबर 2023 : आज नवी दिल्लीत 69 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांना प्रशस्तीपत्र आणि मेडल प्रदान करण्यात आलं. यावेळी अभिनेत्री आलिया भट्टला ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी जेव्हा आलिया मंचावर पोहोचली, तेव्हा पती रणबीर कपूरने अत्यंत खास गोष्ट केली. त्या क्षणांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपल्या पत्नीवर रणबीरला किती अभिमान वाटतोय, हे या व्हिडीओत स्पष्ट पहायला मिळतंय.
राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलिया तिचा पती रणबीरसोबत नवी दिल्लीला पोहोचली. यावेळी तिने तिच्या खास लूकनेही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. कारण या खास दिवसासाठी आलियाने तिची सर्वांत खास साडी नेसली होती. आलियाने तिच्या लग्नात जी साडी नेसली होती, तिच साडी नेसून ती राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात पोहोचली होती. यावेळी सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. सोशल मीडियावरही आलियाचा हा लूक क्षणार्धात व्हायरल झाला.
पहा व्हिडीओ
Just a proud husband supporting his wife! Such a cute gesture 😍
@aliaa08 receiving Best Actress award from Honourable President for Gangubai Kathiawadi 🎬 ❤️#RanbirKapoor #AliaBhatt #NationalFilmAwards2023 #NationalFilmAwards #NationalAwards #GangubaiKathiawadi pic.twitter.com/Apeqo9x0fC
— Scroll & Play (@scrollandplay) October 17, 2023
पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर जाण्याआधी आलियाने आधी मंचाला स्पर्श करत वंदन केलं आणि त्यानंतर ती पुढे गेली. राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्या हस्ते जेव्हा तिला पुरस्कार प्रदान करण्यात आला तेव्हा प्रेक्षकांमध्ये बसलेल्या रणबीर कपूरने आपल्या मोबाइल फोनमध्ये तिचा व्हिडीओ शूट केला. हा व्हिडीओ शूट करताना त्याच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट पहायला मिळत होता. आलियासोबतच या कार्यक्रमात ‘पुष्पा’ स्टार अल्लू अर्जुन, कृती सनॉन, पंकज त्रिपाठी, करण जोहर, विवेक अग्निहोत्री, पल्लवी जोशी आणि आर. माधवन हे कलाकारसुद्धा सहभागी झाले होते.
पुरस्कारांची यादी-
राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी – द काश्मीर फाइल्स
सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट – RRR
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म – रॉकट्री: द नंबी इफेक्ट
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन – पुष्पा / आरआरआर
सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट – गंगुबाई काठियावाडी
सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझायनर – सरदार उधम सिंग
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझायनर – सरदार उधम सिंग
सर्वोत्कृष्ट संपादन – गंगुबाई काठियावाडी
सर्वोत्कृष्ट छायांकन – सरदार उधम सिंग
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – पल्लवी जोशी (द काश्मीर फाइल्स)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – पंकज त्रिपाठी (मिमी)
सर्वोत्कृष्ट बालकलाकार – भाविन रबारी
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – आलिया भट्ट (गंगुबाई काठियावाडी), क्रिती सॅनन (मिमी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता – अल्लू अर्जुन (पुष्पा द राइज)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – निखिल महाजन (गोदावरी – द होली वॉटर)