“पतीच्या दोन घटस्फोटांशी मला समस्या नाही तर तुम्ही कोण बोलणारे?”; ट्रोलर्सना नेहा पेंडसेचं उत्तर
अभिनेत्री नेहा पेंडसेला बिझनेसमन शार्दुल सिंह बयासशी लग्न केल्यानंतर अनेकांनी ट्रोल केलं. हाच भेटला का, असा सवाल टीकाकारांनी नेहाला केला. या ट्रोलिंगवर आता नेहाने सडेतोड उत्तर दिलं आहे. लग्नाच्या तीन वर्षांनंतर नेहा याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली आहे.
मुंबई : 1 डिसेंबर 2023 | टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘भाभीजी घर पर है’मध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री नेहा पेंडसे सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. नेहाने वयाच्या 36 व्या वर्षी करोडपती बिझनेसमनशी लग्न केलं. शार्दुल सिंह बयासचं नेहासोबत हे तिसरं लग्न होतं. याआधी त्याचा दोन वेळा घटस्फोट झाला होता. लग्नापूर्वी शार्दुल आणि नेहा एकमेकांना काही वर्षे डेट करत होते. त्यानंतर त्यांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. मात्र नेहाचा हा निर्णय अनेकांना खटकला. त्यांनी तिला शार्दुलशी लग्न करण्यावरून प्रचंड ट्रोल केलं. या ट्रोलिंगला आता खुद्द नेहाने सडेतोड उत्तर दिलं आहे.
एका मुलाखतीत नेहा म्हणाली, “भूतकाळात मीसुद्धा काही रिलेशनशिप्समध्ये होती. पण जेव्हा मला त्यासाठी ट्रोल केलं गेलं किंवा माझ्या पतीला त्यावरून काही म्हटलं गेलं, तेव्हा आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं. जर माझ्या पतीला माझ्या भूतकाळाशी काही समस्या नसेल तर मला त्याच्या भूतकाळाशी काही समस्या का असेल? त्याचं आधी दोनदा लग्न झालं आणि दोनदा घटस्फोट झाला. याने काय फरक पडणार आहे? लोकांनी तर मला अनेकदा बॉडीशेमसुद्धा केलं. पण त्यामुळे मी काम करणं बंद केलं नाही. मी आजसुद्धा इंडस्ट्रीत सक्रिय आहे आणि माझ्या पतीसोबत मी वैवाहिक आयुष्यात खुश आहे.”
View this post on Instagram
लग्नाच्या वेळी शार्दुललाही नेटकऱ्यांनी बॉडीशेम केलं होतं. त्यावरून नेहाने एका मुलाखतीत ट्रोलर्सना सुनावलं होतं. “एखाद्या व्यक्तीला शारीरिक, मानसिक किंवा आरोग्याचे त्रास असू शकतात. शार्दुल तर मनोरंजन विश्वातीलही नाही. तो व्यावसायिक आहे. त्यामुळे त्याला ट्रोल करणं मूर्खपणाचं आहे. ‘हाच मिळाला का?’ किंवा ‘कोणी दुसरा मिळाला नाही का?’ असं विचारणं असभ्यपणाचं लक्षण आहे”, असं ती म्हणाली होती.
“तो माणूस मला किती आनंदी ठेवतो, याची तुम्हाला कल्पना आहे का? माझ्यासाठी कोण चांगलं आणि कोण वाईट हे ठरवणारे तुम्ही कोण? फ्रस्ट्रेशनमधून ही नकारात्मकता येते, हे मी समजू शकते. काही जणांना लक्ष वेधून घेण्याची सवय असते, तर कोणाकडे आयुष्यात ध्येयच नसतं. इतकी वाट पाहिल्यानंतर शार्दुलच्या रुपाने मला खरं प्रेम गवसलं आहे आणि या ट्रोल्सपुढे मी झुकणार नाही,” अशा शब्दांत नेहाने टीकाकारांना उत्तर दिलं होतं.