Nitin Desai | मोहरमच्या सुट्टीच्या दिवशी बाऊन्सर घेऊन स्टुडिओचा ताबा..; नितीन देसाई यांच्या पत्नीचा गौप्यस्फोट
शुक्रवारी नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी याप्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. ईसीएल फायनान्स कंपनी एडलवाईज ग्रुपचे पदाधिकारी यांनी कर्जप्रकरणामध्ये वारंवार तगादा लावून नितीन देसाई यांना मानसिक त्रास दिला.
अलिबाग | 5 ऑगस्ट 2023 : कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणात ईसीएल फायनान्स कंपनी आणि एडलवाईज ग्रुपच्या पाच पदाधिकाऱ्यांविरोधात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. नितीन देसाई यांनी 2 ऑगस्टला चौक इथल्या एनडी स्टुडिओमध्ये आत्महत्या केली होती. शुक्रवारी नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी याप्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. ईसीएल फायनान्स कंपनी एडलवाईज ग्रुपचे पदाधिकारी यांनी कर्जप्रकरणामध्ये वारंवार तगादा लावून नितीन देसाई यांना मानसिक त्रास दिला. या मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असा आऱोप त्यांनी या तक्रारीत केला आहे.
29 जुलै रोजी एडलवाईज कंपनी एनडी स्टुडिओचा ताबा घेण्याच्या तयारीत होती
’29 जुलै रोजी एडलवाईज कंपनी एनडी स्टुडिओचा ताबा घेण्याच्या तयारीत होती. कोर्टाने जितेंद्र कोठारी यांची प्रशासक म्हणून नेमणूक केली असताना ते एडलवाईज कंपनीच्या इशाऱ्यावर काम करत होते. 29 जुलै रोजी मोहरमची सुट्टी असतानाही बाऊन्सर घेऊन एडलवाईज कंपनी स्टुडिओचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत होती. या कंपनीच्या लोकांनी वन टाइम सेटलमेंट करण्याच्या नावाखाली गोड बोलून स्टुडिओ गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला’, असा गौप्यस्फोट नेहा देसाई यांनी केला.
ऑडिओ क्लिपमध्ये नितीन देसाई काय म्हणाले?
“रशेष शाह हा गोडबोल्या असून अनेक छोट्या मोठ्या उद्योजकांसाठी कष्टाने बनवलेला माझा स्टुडिओ त्याने गिळण्याचा प्रयत्न केला. मी शंभर फोन केले, परंतु त्याने ते उचलले नाही. आर्थिक गुन्हे शाखा, एनसीएलटी कोर्ट, डीआरटी यांच्याकडून माझा प्रचंड छळ केला जातोय. माझ्याकडे दोन ते तीन गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यासाठी तयार असतानाही मला सहकार्य केलं जात नाही. माझ्यावर दुप्पट-तिप्पट कर्जाचा बोजा टाकून ताण दिला जातोय. स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी माझ्यावर वेगळ्या पद्धतीने दबाव आणून मी दिलेल्या गोष्टी मान्य करत नाहीत”, असा आरोप देसाईंनी ऑडिओ क्लिपमध्ये केला आहे.
“स्मित शहा, केयुर मेहता आणि आर. के. बंसल यांनी माझा स्टुडिओ लुटण्याचा, माझी नाचक्की करण्याचा आणि मला घेरण्याचा प्रयत्न केला. या लोकांनी माझी वाट लावली आहे. मला पैशांच्या बाबतीत धमक्या देऊन नराधमांनी माझ्यावर दबाव आणला. सोन्यासारखं असलेलं ऑफिस विकायला लावलं. एका मराठी कलाकाराला जीवे मारण्याचं काम या नराधमांकडून होत आहे. माझ्याविरोधात षडयंत्र करून दडपून टाकून संपवण्यात आलं. माझ्या मनात नसतानाही त्यांनी मला हे कृत्य करायला भाग पाडलं आहे,” असंही त्यांनी त्यात म्हटलंय.