मुंबई : अँड द ऑस्कर गोज टू… हे शब्द ऐकण्यासाठी हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत असंख्य कलाकार आतुरतेने वाट पाहत असतात. यंदाच्या पुरस्कार सोहळ्याची भारतीयांमध्येही फार उत्सुकता आहे. आमिर खानच्या ‘लगान’ या चित्रपटाला 2002 मध्ये ऑस्करचं नामांकन मिळालं होतं. त्यानंतर आता 95व्या अकॅडमी अवॉर्ड्समध्ये भारताच्या तीन चित्रपटांना वेगवेगळ्या विभागांमध्ये नामांकनं मिळाली आहेत. त्यापैकी एस. एस. राजामौलींच्या ‘RRR’ या चित्रपटाचाही समावेश आहे. या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने आधीच ग्रॅमी पुरस्कार आपल्या नावे केला आहे. त्यानंतर आता भारतीयांना ऑस्कर पुरस्काराची प्रतीक्षा आहे. हा पुरस्कार सोहळा कधी आणि किती वाजता पार पडणार, त्याचसोबत भारतीयांना तो कुठे पाहता येईल, याबद्दलची माहिती जाणून घेऊयात..
‘द अकॅडमी अवॉर्ड्स’ म्हणजेच ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचं आयोजन 12 मार्च रोजी रात्री 8 वाजता लॉस एंजिलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये करण्यात आलं आहे. भारतीय वेळेनुसार त्याचं लाइव्ह टेलिकास्ट आपण 13 मार्च रोजी सकाळी 5.30 वाजल्यापासून पाहू शकतो. या पुरस्कार सोहळ्याची स्ट्रिमिंग युट्यूब, हुलू लाइव्ह टीव्ही, डायरेक्ट टीव्ही, FUBO टीव्ही, AT&T टीव्हीवर होणार आहे. त्याची जबाबदारी ABC नेटवर्कने स्वीकारली आहे. भारतात त्याचं स्ट्रिमिंग डिस्ने प्लस हॉटस्टारवर होणार आहे. याशिवाय ABC च्या वेबसाइट किंवा ॲपवरही तुम्ही हा पुरस्कार सोहळा लाइव्ह पाहू शकता.
RRR मधील ‘नाटू नाटू’ या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या विभागात नामांकन मिळालं आहे. या विभागात एकूण पाच गाणी आहेत, त्यापैकीच एक नाटू नाटू हे गाणं आहे. RRR शिवाय भारताकडून पाठवलेल्या ‘ऑल दॅट ब्रीद्स’ला (All That Breathes) बेस्ट डॉक्युमेंट्री फीचर फिल्म विभागात आणि ‘द एलिफेंट व्हिस्परर्स’ला (The Elephant Whisperers) बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म विभागात नामांकन मिळालं आहे. त्यामुळे भारताकडून एकूण तीन चित्रपटांना नामांकनं मिळाली आहेत.
गेल्या वर्षीप्रमाणे यावेळी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात तीन निवेदक नसतील. गेल्या वर्षी रेगीना हॉल, एमी स्कमर आणि वांडा साइक्स यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं होतं. मात्र यावेळी कॉमेडियन जिमी किमेल ऑस्करचं सूत्रसंचालन करणार आहे.
यावेळी भारताकडून अभिनेत्री दीपिका पदुकोण या अवॉर्ड शोमध्ये प्रेझेंटर म्हणून सर्वांसमोर येणार आहे. सध्या देशातील आघाडीची अभिनेत्री म्हणून दीपिकाचं मोठं नाव आहे. जगभरात तिचा मोठा चाहतावर्ग आहे.