‘मिर्झापूर’ वेब सीरिजमधील अभिनेत्याचं निधन; सत्कार समारंभात छातीत दुखू लागल्याने बेशुद्ध पडले
शाहनवाज यांनी 80च्या दशकात आपल्या फिल्मी करियरला सुरुवात केली होती. त्यांनी दूरदर्शनवरील श्री कृष्ण मालिकेत नंदाची भूमिका साकारली होती. त्यानंतर ते अलिफ लैलामध्ये दिसून आले होते.
मुंबई : टीव्हीसह बॉलिवूड आणि ओटीटीवर आपल्या अभिनयाची छाप सोडणारे अभिनेते शाहनवाज प्रधान यांचं निधन झालं आहे. ते 56 वर्षाचे होते. एका सत्कार समारंभात गेले असता त्यांच्या छातीत अचानक दुखू लागलं. त्यामुळे ते तिथेच बेशुद्ध पडले. त्यामुळे त्यांना तात्काळ अंधेरीच्या कोकिळाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यता आलं. तिथे उपचार सुरू असतानाच त्यांचं निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. मिर्झापूर या वेब सीरिजमध्ये शाहनवाज प्रधान यांनी गुड्डू भैयाच्या सासऱ्याची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका खूप गाजली होती. या भूमिकेमुळेच ते घराघरात पोहोचले होते. मात्र, अचानक त्यांचं निधन झाल्याने बॉलिवूडमधून शोक व्यक्त होत आहे.
काल संध्याकाळी ही दु:खद घटना घडली. शाहनवाज प्रधान हे एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी गेले होते. सत्कार समारंभाचा हा कार्यक्रम होता. कार्यक्रमात त्यांच्या छातीत कळ येऊ लागली. छातीत दुखत असल्याचं त्यांनी सांगितलं आणि बेशुद्ध पडले. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. पण त्यांची प्राणज्योत मालवली होती.
व्यक्ती म्हणूनही ग्रेट
शाहनवाज प्रधान यांच्या निधनावर अभिनेते संदीप मोहन यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनीच शाहनवाज यांच्या मृत्यूची बातमीही दिली आहे. अत्यंत दु:खद मनाने सांगावं वाटतं की, श्रीकृष्णाचे नंद बाबा आणि लोकप्रिय अभिनेता सर्वांचे प्रिय शाहनवाज प्रधान यांचं आज अचानक निधन झालं आहे.
शाहनवाज भाई हे आम्हा सर्वांना सीनियर होते. ते एक चांगले कलाकार होतेच, शिवाय ते चांगले व्यक्तीही होते. शाहनवाज भाई कंटिन्यूटीचे मास्टर होते, असं संदीप मोहन यांनी म्हटलं आहे.
Shahnawaz bhai aakhiri salaam !!! Kya gazab ke zaheen insaan aur kitne behatar adaakar the aap. Mirzapur ke dauran kitna sundar waqt guzara aapke saath, Yaqeen nahin ho raha ?#purushram #mirzapur pic.twitter.com/GviB4x53bj
— Rajesh Tailang (@rajeshtailang) February 17, 2023
हसरा चेहरा सतत आठवेल
शॉट वाईड असो, मिड असो की क्लोज. शाहनवाज भाईंची बॉडी लँग्वेज कधीच बदलली नाही. अभिनय क्षेत्रातील ही मोठी गोष्ट आहे. त्यामुळेच प्रत्येक एडिटर शाहनवाज भाईंचं कौतुक करायचा. अभिनयाबरोबरच ते चांगले डबिंग आर्टिस्टही होते. त्यांचा हसरा चेहरा आम्हाला सतत लक्षात राहील. मोठ्या भावाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असं संदीप मोहन यांनी म्हटलं आहे.
तो फोटो चर्चेत
9 आठवड्यांपूर्वीच शाहनवाज प्रधान यांनी त्यांचा 55 वा वाढदिवस साजरा केला होता. हातात केक घेऊन त्यांनी फोटोही शेअर केला होता. या फोटोवर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाबद्दल धन्यवाद, असं कॅप्शन देण्यात आलं होतं.
चाहत्यांकडूनही श्रद्धांजली
शाहनवाज प्रधान यांच्या निधनावर त्यांच्या चाहत्यांनीही शोक व्यक्त केला आहे. शाहनवाज यांनी श्री कृष्ण मालिकेत नंद बाबाची भूमिका साकारली होती. अलिफ लैलामध्ये सिंदबाद जहाजींची भूमिका साकरली होती. त्यांच्या या दोन्ही भूमिका गाजल्या होत्या. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दात त्यांच्या फॅन्सनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
गुड्डू भैय्याचे सासरे म्हणून प्रसिद्ध
मिझापूर या वेब सीरीजमध्ये त्यांनी गुड्डू भैय्याच्या सासऱ्याची भूमिका साकारली होती. या वेब सीरीजमध्ये श्वेता (गोलू) आणि श्रिया पिळगावकर (स्वीटी)चे वडील परशुराम गुप्ताची भूमिका शाहनवाज यांनी साकारली होती.
मिर्झापूर तीनमध्ये ही दिसणार
शाहनवाज यांचा मिड डे मिल हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. ते लवकरच मिर्झापूर-3 मध्येही दिसणार आहेत. त्यांनी या वेब सीरिजचं चित्रिकरण नुकतच पूर्ण केलं आहे.
80 च्या दशकात करियरला सुरुवात
शाहनवाज यांनी 80च्या दशकात आपल्या फिल्मी करियरला सुरुवात केली होती. त्यांनी दूरदर्शनवरील श्री कृष्ण मालिकेत नंदाची भूमिका साकारली होती. त्यानंतर ते अलिफ लैलामध्ये दिसून आले होते. नंतर त्यांनी इतरही मालिका आणि सिनेमांमध्ये कामे केली. मिर्झापूरच्या दोन्ही सीजनमध्येही त्यांची महत्त्वाची भूमिका होती. रईस, खुदा हाफिज, फॅमिली मॅनमध्येही त्यांनी काम केलं होतं.