Parineeti Chopra | ‘मला वडिलांसारखा पती नको’; परिणीतीच्या वक्तव्याने आमिर खानही झाली होता चकीत!
अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा लवकरच आपल्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत. अशातच परिणीतीची जुनी मुलाखत चर्चेत आली आहे. या मुलाखतीत ती तिच्या ड्रीम पार्टनरविषयी बोलताना दिसतेय. मला माझ्या वडिलांसारखा पती नको, असं ती म्हणाली होती.
मुंबई | 23 सप्टेंबर 2023 : अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा हे 24 सप्टेंबर रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. या लग्नसोहळ्यासाठी उदयपूरमधील ‘द लीला पॅलेस’ आणि ‘ताज लेक पॅलेस’ सजावण्यात आले आहेत. दोन्ही कुटुंबीयांचे पाहुणेसुद्धा उदयपूरला पोहोचले आहेत. अशातच परिणीतीची एक जुनी मुलाखत चर्चेत आली आहे. या मुलाखतीत तिने तिच्या स्वप्नातील पार्टनरबद्दल सांगितलं होतं. त्याचसोबत तिने तिच्या वडिलांबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. मला माझ्या वडिलांसारखा पती नको, असं ती या मुलाखतीत म्हणाली होती. यामागचं कारणसुद्धा परिणीतीने सांगितलं.
परिणीतीने आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी तिने तिच्या ड्रीम पार्टनरविषयी वक्तव्य केलं होतं. “मी अनेकांना असं म्हणताना ऐकलंय की मला माझ्या वडिलांसारखा जोडीदार हवा आहे. पण माझं मत त्याविरोधात आहे. मला माझ्या वडिलांसारखा पती नकोय”, असं परिणीती म्हणाली होती. हे ऐकून आमिरसुद्धा थक्क झाला होता. त्याने तिला यामागचं कारण विचारलं. त्यावर ती पुढे सांगते, “माझे वडील फार कठोर होते. त्यांना मुलांचं किंवा पुरुषांचं रडणं चुकीचं वाटतं. जर कधी त्यांच्या भावाच्या डोळ्यात अश्रू आले, तर बाबा म्हणायचे, काय मुलींसारखा रडतोयस? मुलांना किचनमध्ये येण्याची परवानगी नाही, असा त्यांचा विचार होता.”
वडिलांच्या अशा मानसिकतेमागे त्यांचा काही दोष नसल्याचंही परिणीती स्पष्ट करते. ते अशाच वातावरणात लहानाचे मोठे झाले. पुरुषांमध्ये अहंकार असतो, अशा मताचे ते आहेत, असं ती सांगते. यानंतर आमिर तिला विचारतो की तिला पुरुषांमधील अहंकार आवडत नाही का? त्यावर ती ‘अजिबात नाही’ असं म्हणते. “माझ्या मते पुरुषांनाही भावना असतात आणि ते त्यांनी मोकळेपणे व्यक्त केले पाहिजेत”, असं परिणीती पुढे सांगते.
24 सप्टेंबर रोजी राजस्थानमधल्या उदयपूरमध्ये परिणीती आणि राघव धूमधडाक्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. 22 सप्टेंबर रोजी चोप्रा आणि चड्ढा कुटुंबीय उदयपूरला पोहोचले. हळूहळू इतरही पाहुणे तिथे पोहोचत आहेत. उदयपूर एअरपोर्टवरून सर्व पाहुण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर समोर येत आहेत.