प्रिती झिंटाच्या मुलीला अज्ञात महिलेनं बळजबरीने केलं किस; अभिनेत्री भडकून म्हणाली “माझी मुलं कोणत्याही पॅकेज डिल..”
'सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे माझी मुलं कोणत्याची पॅकेड डीलचा भाग नाहीत किंवा ते कोणाचा शिकार बनण्यासाठी नाहीत. त्यामुळे कृपया माझ्या मुलांना एकटं सोडा आणि त्यांचे फोटो काढण्यासाठी किंवा त्यांना स्पर्श करण्यासाठी येऊ नका.'
मुंबई : अभिनेत्री प्रिती झिंटासोबत नुकत्याच अशा दोन घटना घडल्या, ज्यामुळे ती चांगलीच हादरली. सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहित तिने या घटनांविषयी सांगितलं. त्याचप्रमाणे प्रितीने त्या व्हिडीओमागील सत्यदेखील सांगितलं, ज्यामध्ये एक दिव्यांग व्यक्ती पैशांसाठी तिच्या कारच्या मागे व्हिलचेअरवर धावताना दिसत आहे. संबंधित घटनेत नेमकं काय घडलं याविषयी तिने सविस्तर पोस्ट लिहिली आहे. यातील एक घटना तिची लहान मुलगी जियाशी संबंधित आहे. जियाला एका अज्ञात महिलेनं बळजबरीने किस केलं होतं.
प्रितीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने दोन वेगवेगळ्या घटनांबद्दल सांगितलं आहे. या दोन्ही घटनांचं वर्णन करत असतानाच तिने व्हिडीओ शूट करणाऱ्या पापाराझींवरही संताप व्यक्त केला आहे.
प्रितीच्या मुलीचं किस घेऊन पळाली अज्ञात महिला
‘या आठवड्यात दोन अशा घटना घडल्या, ज्यामुळे मी खूप घाबरले होते. यातील पहिली घटना माझी लहान मुलगी जियाशी संबंधित आहे. एका अनोळखी महिलेनं तिचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला. आम्ही तिला प्रेमाने तसं न करण्यास सांगितलं तेव्हा ती तिथून निघून गेली. पण नंतर अचानक ती समोर आली आणि बळजबरीने तिने माझ्या लहान मुलीला उचलून घेतलं. नंतर ती जियाच्या चेहऱ्यावर किस करून तिथून पळाली. तुझी मुलगी खूप क्युट आहे, असं बोलून तिने तिथून पळ काढला. ती महिला एका पॉश इमारतीत राहते आणि ती त्याच बागेत होती, जिथे माझी मुलं खेळत होती. जर मी सेलिब्रिटी नसते तर मी कदाचित खूप वाईट प्रतिक्रिया दिली असती, परंतु मी शांत राहिले. कारण मला तिथे कोणताच तमाशा करायचा नव्हता’, असं प्रितीने एका घटनेविषयी लिहिलं.
दिव्यांग व्यक्तीच्या व्हिडीओमागील सत्य
प्रिती झिंटाने दुसऱ्या घटनेचा व्हिडीओ शेअर करत पुढे लिहिलं, ‘दुसरी घटना तुम्ही या व्हिडीओत पाहू शकता. मला फ्लाइटसाठी उशीर होईल अशी भीती असताना एका दिव्यांग व्यक्तीने मला रोखण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही वर्षांपासून ती व्यक्ती मला पैशांसाठी त्रास देत आहे. पण यावेळी त्याने विचारलं तेव्हा मी सॉरी म्हणाले. कारण माझ्याकडे रोख रक्कम नव्हती, फक्त क्रेडिट कार्ड होते. माझ्यासोबत असलेल्या महिलेनं तिच्या पर्समधून काही पैसे दिले. ते पैसे त्या व्यक्तीने महिलेवर फेकून दिले. कारण ते पुरेसे नव्हते. मग तो रागावला आणि आमचा पाठलाग करत येत होता. त्यानंतर पुढे तो आणखी आक्रमक झाला.’
पापाराझींबद्दल प्रिती म्हणाली, “फोटोग्राफर्सना ही घटना मजेशीर वाटली. आमची मदत करण्याऐवजी ते व्हिडीओ शूट करत बसले आणि हसत होते. गाडीचा पाठलाग करू नका किंवा त्यांना त्रास देऊ नका, असं कोणीही त्या दिव्यांग व्यक्तीला समजावलं नाही. जर त्या व्यक्तीचा अपघात झाला असता तर तिथे मलाच दोषी ठरवलं असतं. माझ्या सेलिब्रिटी असण्यावरून प्रश्न निर्माण केले असते. बॉलिवूडला दोष दिला असता आणि खूप नकारात्मकता पसरवली गेली असती.”
“माझी मुलं कोणत्याही पॅकेज डीलचा भाग नाहीत”
प्रितीने पुढे लिहिलं, ‘मला वाटतं की आता लोकांनी हे समजलं पाहिजे की मी आधी एक माणूस आहे, नंतर एक आई आणि त्यानंतर एक सेलिब्रिटी आहे. मला माझ्या यशाबद्दल सतत माफी मागण्याची आणि त्यामुळे त्रस्त होण्याची काहीच गरज नाही. कारण मी आज जिथे आहे तिथे पोहोचण्यासाठी मी खूप मेहनत केली आहे. मला या देशात जगण्याचा समान अधिकार आहे. त्यामुळे कृपया माझ्याबद्दल कोणतंही मत बनवण्याआधी विचार करा. कृपया प्रत्येक गोष्टीसाठी सेलिब्रिटींना दोष देणं थांबवा. प्रत्येक कथेच्या दोन बाजू असतात.’
“माझ्या मुलांना स्पर्श करू नका किंवा त्यांचे फोटो काढू नका”
या पोस्टच्या अखेरीस प्रितीने तिची बाजू ठामपणे मांडली. ‘सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे माझी मुलं कोणत्याची पॅकेड डीलचा भाग नाहीत किंवा ते कोणाचा शिकार बनण्यासाठी नाहीत. त्यामुळे कृपया माझ्या मुलांना एकटं सोडा आणि त्यांचे फोटो काढण्यासाठी किंवा त्यांना स्पर्श करण्यासाठी येऊ नका. ती लहान मुलं आहेत, सेलिब्रिटी नाहीत. त्यामुळे त्यांना लहान मुलांसारखंच वागवलं पाहिजे. मला आशा आहे की जे फोटोग्राफर आम्हाला फोटो, व्हिडीओ आणि साऊंड बाईट्ससाठी (प्रतिक्रिया) विचारतात, त्यांच्यात इतकी तरी माणुसकी आणि समज असेल की पुन्हा अशा घटनांना शूट करण्याऐवजी ते मदत करायला धावतील.’
प्रिती झिंटाने 2016 मध्ये अमेरिकन उद्योगपती जीन गुडइनफशी लग्न केलं. 2021 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून ती दोन मुलांची आई झाली. प्रितीला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.