Ranbir Deepika | ‘यादें मिठाई के डिब्बे की तरह..’ म्हणत दीपिकाने पोस्ट केला रणबीरसोबतचा खास फोटो
रणबीर कपूर, दीपिका पदुकोण, आदित्य रॉय कपूर आणि कल्की कोचलीन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाची कथा मैत्री आणि नात्यांवर आधारित आहे. दहा वर्षांनंतर आजही हा चित्रपट अनेकांच्या लोकप्रिय चित्रपटांच्या यादीत समाविष्ट आहे.
मुंबई : अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटाचे असंख्य चाहते आहेत. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला नुकतीच दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त चित्रपटातील मुख्य कलाकारांनी एकमेकांची भेट घेत आनंद साजरा केला. यावेळी रणबीर कपूर, दीपिका पदुकोण, आदित्य रॉय कपूर, कल्की कोचलीन यांच्यासोबतच निर्माता करण जोहर, फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा आणि चित्रपटाची इतर टीमसुद्धा उपस्थित होती. या पार्टीचे फोटो अभिनेत्री दीपिका पदुकोणने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. दीपिकाने हे फोटो पोस्ट करताच त्यावर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होऊ लागला आहे. या पार्टीच्या निमित्ताने रणबीर आणि दीपिका एकाच फ्रेममध्ये दिसले.
दीपिकाने या फोटोंच्या कॅप्शनमध्ये चित्रपटातील तिचा एक डायलॉग लिहिला आहे. ‘यादें मिठाई के डिब्बे की तरह होती है; एक बार खुला तो सिर्फ एक टुकड़ा नहीं खा पाओगे- नैना तलवार,’ असं तिने लिहिलं आहे. बुधवारी दीपिकाने या चित्रपटाचा एक व्हिडीओसुद्धा इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. ‘माझ्या हृदयाचा तुकडा’ असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं होतं. रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण हे एकेकाळी एकमेकांना डेट करत होते. ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटातील दोघांच्या जोडीला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळालं. त्यामुळे या जोडीला बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा एकाच फ्रेममध्ये पाहून चाहते खुश झाले. दीपिकाने पोस्ट केलेल्या फोटोवर चाहत्यांकडून कमेंट बॉक्समध्ये चित्रपटातील गाजलेले डायलॉग्स लिहिले जात आहेत.
अयान मुखर्जीने ‘ये जवानी है दिवानी’चा एक व्हिडीओ शेअर करत लिहिलं होतं, ‘माझं दुसरं बाळ, माझ्या हृदयाचा आणि आत्म्याचा एक तुकडा. आज त्याला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. इतक्या वर्षांनंतर मी हे आत्मविश्वासाने म्हणू शकतो की या चित्रपटाला बनवणं हा माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठा आनंद होता. या चित्रपटातून मी जे मिळवलं ती माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.’
पहा फोटो
View this post on Instagram
रणबीर कपूर, दीपिका पदुकोण, आदित्य रॉय कपूर आणि कल्की कोचलीन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाची कथा मैत्री आणि नात्यांवर आधारित आहे. दहा वर्षांनंतर आजही हा चित्रपट अनेकांच्या लोकप्रिय चित्रपटांच्या यादीत समाविष्ट आहे. यातील गाणी, संवाद आजही चाहत्यांच्या तोंडपाठ आहेत.