घरातील सामान विकण्याची वेळ आली होती..; त्या कठीण काळाविषयी रणदीप हुडा व्यक्त
'बॅटल ऑफ सारागढी' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रणदीप हुडाला बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागलं होतं. त्यावेळी त्याला घरातील बऱ्याच गोष्टी विकाव्या लागल्या होत्या. यात त्याच्या आवडत्या घोड्याचाही समावेश होता. या काळात रणदीपने नैराश्याचाही सामना केला.
अभिनेता रणदीप हुडाचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट शुक्रवारी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षक-समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटाच्या माध्यमातून रणदीपने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलंय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रणदीप त्याच्या व्यावसायिक आयुष्यातील कठीण काळाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. ‘बॅटल ऑफ सारागढी’ हा चित्रपट जेव्हा अडचणीत सापडला तेव्हा नैराश्यात गेल्याचाही खुलासा त्याने केला. ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीत रणदीप म्हणाला, “बॅटल ऑफ सारागढी या चित्रपटासाठी मी खूप मेहनत घेतली होती. तीन वर्षे मी दाढी, केस वाढवले होते. भूमिकेसाठी पूर्ण तयारी केली होती. पण तो चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही. माझ्यासाठी तो काळ खूप कठीण होता आणि मी नैराश्याच्या गर्तेत अडकलो होतो.”
याविषयी तो पुढे म्हणाला, “माझं आयुष्य अर्ध संपल्यासारखं वाटत होतं. मी एकदा सुवर्णमंदिरात गेलो होतो. त्याठिकाणी मी प्रार्थना केली होती की माझा चित्रपट पूर्ण होईपर्यंत मी माझे केस कापणार नाही. जेव्हा तो पूर्ण झाला, तेव्हा मी केस कापले आणि आयुष्यात पुढे गेलो. त्या चित्रपटानंतर खरा संघर्ष सुरू झाला होता. कारण तीन वर्षांपर्यंत माझ्याकडे कोणतंच काम नव्हतं. माझं वजन वाढलं होतं आणि मी अत्यंत वाईट दिसत होतो. काय करावं हेच मला समजत नव्हतं. माझ्या आईवडिलांना माझी खूप काळजी वाटत होती.”
View this post on Instagram
आयुष्यातील या संघर्षाच्या काळामुळे अभिनेता म्हणून आणखी घडत गेल्याचंही त्याने सांगितलं. “जर मला लगेच यश मिळालं असतं तर मी चांगला अभिनेता कधीच होऊ शकलो नसतो. मी आणखी मेहनत करणं सोडून दिलं असतं. पण त्या संघर्षानेच मला घडवलंय”, असं तो म्हणाला. रणदीपच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाने दोन दिवसांत 4.85 कोटी रुपये कमावले आहेत.
रणदीपचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट 22 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. लंडन, महाराष्ट्र आणि अंदमान निकोबार द्विपसमूहातील विविध ठिकाणी याचं शूटिंग पार पडलं. या बायोपिकच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्य चळवळीवर वेगळ्या दृष्टीकोनातून प्रकाश टाकण्यात आला आहे. आधी महेश मांजरेकर या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार होते. मात्र शूटिंगदरम्यान रणदीपसोबत काही मतभेद झाल्याने त्यांनी या प्रोजेक्टमधून माघार घेतली.