लक्षद्वीप समजून मालदीवचे फोटो केले पोस्ट; रणवीर सिंगला चूक पडली महागात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये करणाऱ्या मालदीवच्या तीन उपमंत्र्यांवर रविवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली. मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर अत्यंत आक्षेपार्ह अशी पोस्ट लिहिली होती. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.
मुंबई : 9 जानेवारी 2024 | मालदीवच्या तीन उपमंत्र्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या अपमानास्पद टिप्पणीनंतर मालदीवची पर्यटन कोंडी करण्याचे सूर भारतातून उमटू लागले आहेत. एकीकडे मालदीवच्या तिन्ही उपमंत्र्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर दुसरीकडे या वादात बॉलिवूड आणि इतर सेलिब्रिटींनीही उडी घेतली. अनेकांनी लक्षद्वीप आणि अंदमान यांसह भारतातील इतर पर्यटन स्थळांविषयी पोस्ट लिहिल्या आहेत. अभिनेता रणवीर सिंगनेही अशीच एक पोस्ट लिहिली होती. मात्र यावेळी केलेली एक चूक त्याला चांगलीच महागात पडली आहे. या चुकीनंतर त्याला त्याची पोस्ट डिलिट करावी लागली.
रणवीर सिंगने चाहत्यांना लक्षद्वीपला भेट देऊन भारतीय संस्कृतीचा विलक्षण अनुभव घेण्याचं आवाहन केलं. ‘2024 या वर्षात भारतातील विविध ठिकाणं पाहुयात आणि आपली संस्कृती अनुभवुयात. आपल्या देशात पाहण्यासारखी निसर्गरम्य ठिकाणे आणि समुद्रकिनारे बरेच आहेत’, असं त्याने लिहिलं. या पोस्टसोबतच त्याने एक फोटो पोस्ट केला. मात्र हा फोटो मालदीवचा असल्याचा दावा नेटकऱ्यांनी केला. यानंतर अनेकांनी रणवीरला ट्रोल करण्यास सुरुवात केली. ‘मालदीववर बहिष्कार टाकण्यासाठी आता रणवीर मालदीवचाच फोटो वापरत आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘लक्षद्वीपचं प्रमोशन करण्याच्या नादात रणवीरने मालदीवचा फोटो पोस्ट केला’, असं दुसऱ्याने म्हटलंय. काहींनी रणवीरने पोस्ट केलेल्या फोटोतील आयलँडची नावंही सांगितली आहेत.
Ranveer Singh uses Maldives picture to promote Lakshadweep Island now he deleted the tweet. pic.twitter.com/ltwNnTDT7S
— Silgan (@Silgan_18) January 8, 2024
या ट्रोलिंगनंतर अखेर रणवीरने त्याची पोस्ट डिलिट केली आणि थोड्या वेळानंतर ट्विटरवर तीच पोस्ट कोणत्याही फोटोशिवाय शेअर केली. रविवारी अक्षय कुमार, वरुण धवन, सलमान खान, श्रद्धा कपूर, जान्हवी कपूर, जॉन अब्राहम यांसह सचिन तेंडुलकर, व्यंकटेश प्रसाद आणि वीरेंद्र सेहवाग यांसारख्या सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून भारतीय पर्यटन स्थळांना भेट देण्याचं आवाहन केलं. या वादामध्ये अमिताभ बच्चन यांनीही आपली भूमिका मांडली. ‘लक्षद्वीप आणि अंदमान ही आश्चर्यकारकरीत्या सुंदर स्थळे आहेत’ असं बच्चन यांनी सोमवारी सांगितलं.