Raveena Karisma | “त्यापेक्षा मी झाडूसोबत..”; करिश्मा कपूरच्या वादावर रवीना टंडनचं बेधडक उत्तर
आता बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा एकदा रवीना करिश्मासोबतच्या वादावर व्यक्त झाली आहे. मात्र या दोघींमधील वाद काही शमला नाही, हे तिच्या प्रतिक्रियेतून सहज स्पष्ट होतंय.
मुंबई: 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री रवीना टंडन आणि करिश्मा कपूर यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. करिश्मामुळे दोन चित्रपटांमधून मला काढून टाकण्यात आलं होतं, असाही आरोप रवीनाने केला होता. आता बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा एकदा रवीना करिश्मासोबतच्या वादावर व्यक्त झाली आहे. मात्र या दोघींमधील वाद काही शमला नाही, हे तिच्या प्रतिक्रियेतून सहज स्पष्ट होतंय. रवीना आणि करिश्माने राजकुमार संतोषी यांच्या ‘अंदाज अपना अपना’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. मात्र ऑफ कॅमेरा दोघींमध्ये प्रचंड कटुता होती.
आता एएनआयला दिलेल्या मुलाखतीत रवीना करिश्मासोबतच्या शत्रुत्वाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. “जर मी आज करिश्मा कपूरसोबत फोटोसाठी पोझ दिला तरी मी काही सुपरस्टार होणार नाही. माझ्या आयुष्यात तिचं तसं कोणतंच स्थान नाही. मी प्रोफेशनल आहे आणि मला काही फरक पडत नाही”, असं सडेतोड उत्तर रवीनाने दिलं.
इतकंच नव्हे तर गरज पडली तर मी झाडूसोबत फोटोसाठी पोझ देईन असंही ती म्हणाली. “करिश्मा आणि माझ्यात काही चांगली मैत्री नाही. हेच अजयसोबतही (अजय देवगण) आहे. प्रोफेशनली मी त्या दोघांसोबतही काम करण्यास तयार आहे. काम करताना मला कोणतीच अडचण नाही. कारण कामाच्या बाबतीत मी मूर्खपणाच्या अहंकाराचा विचार करत नाही”, असं तिने स्पष्ट केलं.
View this post on Instagram
शिल्पा शेट्टी, उर्मिला मातोंडकर, निलम आणि राणी मुखर्जी यांसारख्या 90 च्या दशकातील इतर अभिनेत्रींच्या नियमित संपर्कात असल्याचंही तिने सांगितलं. हे सर्वजण बऱ्याचदा एकमेकांची भेट घेतात आणि एकत्र पार्टीसुद्धा करतात. “आधीच्या काळीही आम्ही एकमेकींना भेटायचो. मी उर्मिलासोबत होळी पार्ट्यांना जायची. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये माझी करिश्मा कपूरशीही भेट होते. मात्र तिने तिच्या मैत्रिणींचा वर्तुळ आधीच अधोरेखित केला आहे”, असं रवीना म्हणाली.
1997 मध्ये रेडिफला दिलेल्या एका मुलाखतीत रवीना म्हणाली होती, “मी त्या अभिनेत्रीचं नाव घेणार नाही. मात्र माझ्यामुळे तिला फार असुरक्षितता वाटायची. तिने मला चार चित्रपटांमधून काढून टाकायला लावलं होतं. मला तिच्यासोबत एका चित्रपटात काम करायचं होतं. पण ती निर्माते आणि अभिनेत्यांच्या जवळची होती. त्यामुळे गोष्टी बदलल्या. मात्र अशा प्रकारचे खेळ मी खेळत नाही.”