Riteish deshmukh: रितेश देशमुख सपत्नीक तुळजाभवानीच्या चरणी; देवीला काय साकडं?
"माझी ती इच्छा पूर्ण"; तुळजाभवानीच्या दर्शनाला आलेल्या जिनिलियाने व्यक्त केला आनंद
सोलापूर: अभिनेता रितेश देशमुख हा ‘वेड’ या चित्रपटानिमित्त दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करतोय. या चित्रपटाने त्याने मुख्य भूमिकादेखील साकारली आहे. विशेष म्हणजे त्याच्यासोबत त्याची पत्नी जिनिलिया डिसूझा देशमुख ही स्क्रीन शेअर करतेय. रितेश-जिनिलियाच्या या मराठी चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी रितेश आणि जिनिलिया हे तुळजाभवानीच्या दर्शनाला पोहोचले. रितेशने तुळजापूरमधल्या तुळजाभवानीचं सपत्नीक दर्शन घेतलं.
“आयुष्यात नवीन काहीतरी कार्य करतोय, त्यामुळे तुळजापूरला येऊन देवीचं दर्शन घेतोय. वेड या चित्रपटाचं मी दिग्दर्शन करतोय. दिग्दर्शक म्हणून हा माझा पहिलाच प्रोजेक्ट आहे, म्हणूनच मी देवीच्या दर्शनाला आलो आहे. प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पाहावा, हीच माझी अपेक्षा आहे. खूप प्रेमाने मी हा चित्रपट बनवला आहे,” असं रितेश यावेळी म्हणाला.
जिनिलियानेही चित्रपटाबाबत प्रतिक्रिया दिली. “खूप वर्षांपासून माझी इच्छा होती की मी मराठी चित्रपटात काम करावं. याबद्दल मी रितेशशी बोललेसुद्धा होते. रितेशने जेव्हा मला वेड या चित्रपटातील भूमिकेची ऑफर दिली, तेव्हा ती भूमिका मला माझ्यासाठी परफेक्ट वाटली,” असं ती म्हणाली. काही दिवसांपूर्वी रितेश आणि जिनिलियाने कोल्हापुरातील अंबाबाईचं दर्शन घेतलं होतं.
वेड या चित्रपटाद्वारे रितेश दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. हा चित्रपट येत्या 30 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये रितेश आणि जिनिलिया मुख्य भूमिकेत आहेत. तर सलमान खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे.