‘असे असतात संस्कार..’; रितेश-जिनिलियाच्या मुलांचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव
रितेश आणि जिनिलियाने जवळपास नऊ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2012 मध्ये लग्न केलं. 2014 मध्ये जिनिलियाने रियानला जन्म दिला. त्यानंतर दोन वर्षांनी तिने राहिलला जन्म दिला.
मुंबई : गेल्या काही काळापासून इंडस्ट्रीत पापाराझी कल्चर मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. बॉलिवूड किंवा टीव्ही सेलिब्रिटी यांचा एअरपोर्टवरील किंवा एखाद्या रेस्टॉरंटमधील फोटो आणि व्हिडीओ पापाराझींकडून शूट केले जातात. या व्हिडीओमध्ये सेलिब्रिटींकडून पापाराझींना दिल्या जाणाऱ्या वागणुकीवरून अनेकदा नेटकरी कमेंट्स करतात. अशाच एका व्हिडीओवरून अभिनेत रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या दोन्ही मुलांचं तोंडभरून कौतुक केलं जातंय. रितेश-जिनिलियाची मुलं जेव्हा पापाराझींसमोर येतात, तेव्हा ते कधीच नखरे दाखवत नाहीत. उलट पापाराझींना ते हात जोडून नमस्कार करताना दिसतात. त्यांच्या याच वागणुकीने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.
रितेश आणि जिनिलियाने त्यांच्या मुलांना योग्य संस्कार शिकवले आहेत, अशा शब्दांत नेटकरी त्यांचं कौतुक करत आहेत. रितेश आणि जिनिलिया हे रियान आणि राहिल या आपल्या दोन मुलांसोबत नुकतेच मुंबई विमानतळावर दिसले. यावेळी पापाराझींना पाहताच रियाने आणि राहिलने हात जोडले आणि त्यांना नमस्कार केला. चिमुकल्यांचा हा अंदाज नेटकऱ्यांना खूपच आवडला.
‘ही मुलं जेव्हा कधी मीडियासमोर येतात, तेव्हा असेच नमस्कार करतात. या दोघांवर देवाचा नेहमीच आशीर्वाद असो’, असं एकाने लिहिलंय. तर ‘उत्तर, संस्कार लहानपणापासून दिसतात’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘बॉलिवूडमधील हे परफेक्ट कपल आहे. इतरांप्रमाणे कधीच शो-ऑफ करत नाहीत’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी रितेश-जिनिलियाचंही कौतुक केलंय.
View this post on Instagram
या कारणामुळे रितेश-जिनिलियाची मुलं हात जोडतात
जिनिलिया आणि रितेश यांना त्यांच्या मुलाबाबत हा प्रश्न विचारण्यात आला होता. वेड चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान पत्रकाराने रितेशला विचारलं होतं की, तो त्याच्या मुलांना पापाराझींसमोर नमस्कार करण्यास सांगतो का? त्यावर जिनिलियाने म्हटलं होतं, “इतरांचा आदर करण्यात कोणतीच तडजोड नाही. ही एक अशी गोष्ट आहे, ज्यावरून मी आणि रितेश खूप सजग असतो आणि त्याची काळजी घेतो. आमच्या घरातही जे लोक येतात किंवा काम करतात, त्यांनासुद्धा आम्ही मामा किंवा काका म्हणूनच हाक मारतो. हीच गोष्ट आम्ही आमच्या मुलांना शिकवली आहे.”
रितेश-जिनिलियाची मुलं पापाराझींना पाहून ‘हा’ प्रश्न विचारतात
जिनिलियाने पुढे सांगितलं, “बाबा, ही लोकं तुमचे फोटो का काढतात?, असा प्रश्न मुलं रितेशला विचारतात. तेव्हा रितेश त्यांना सांगतो की, ते आपल्या कामासाठी आहे. आम्ही जे काम केलंय, त्याच्या बदल्यात ते आमचे फोटो क्लिक करतात. पण तुम्ही आतापर्यंत असं काहीच केलं नाही, त्यामुळे हात जोडून नमस्ते बोलणं हे त्यांच्या प्रती आभार व्यक्त करण्याची एक पद्धत आहे. तुमच्या मुलांना अशा गोष्टी शिकवण्याची खूप गरज आहे. त्यांना थँक्यू आणि प्लीजसुद्धा बोलता आलं पाहिजे.”