अवघ्या 9 वर्षांच्या जेटशेननं पटकावलं ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’चं विजेतेपद; जाणून घ्या बक्षिसाची रक्कम..
जेटशेनने वयाच्या तिसऱ्या वर्षापासून संगीत शिकण्यास सुरूवात केली. संपूर्ण सिझनमध्ये तिने दमदार गाणी सादर केली. शोमधील प्रत्येक परीक्षक, ज्युरी मेंबर्स आणि पाहुणे म्हणून हजेरी लावणाऱ्या सेलिब्रिटींकडून जेटशेनच्या गायकीचं भरभरून कौतुक व्हायचं.
मुंबई: अवघ्या नऊ वर्षांच्या जेटशेन दोहना लामाने ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’च्या नवव्या सिझनचं विजेतेपद पटकावलं. जेटशेन ही सिक्किममधील पाक्योंग इथली आहे. रविवारी या शोचा ग्रँड फिनाले पार पडला. यावेळी ती हर्ष सिकंदर आणि ज्ञानेश्वरी गाडगे यांना मागे टाकत विजेती ठरली. जेटशेनला ट्रॉफी आणि 10 लाख रुपये बक्षिस म्हणून मिळाले. रफा येस्मिन, अतनू मिश्रा आणि अथर्व बक्षी हे स्पर्धक टॉप 6 मध्ये पोहोचले होते.
जेटशेनने वयाच्या तिसऱ्या वर्षापासून संगीत शिकण्यास सुरूवात केली. संपूर्ण सिझनमध्ये तिने दमदार गाणी सादर केली. शोमधील प्रत्येक परीक्षक, ज्युरी मेंबर्स आणि पाहुणे म्हणून हजेरी लावणाऱ्या सेलिब्रिटींकडून जेटशेनच्या गायकीचं भरभरून कौतुक व्हायचं. जेटशेनला तिच्या आवाजामुळे आणि गाण्याच्या विशिष्ट स्टाइलमुळे ‘मिनी सुनिधी चौहान’ हे नाव देण्यात आलं.
जेटशेन विजेती ठरल्यानंतर सिक्किमचे मुख्यमंत्री आणि बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कोम यांनीसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिला शुभेच्छा दिल्या. शंकर महादेवन, अनु मलिक आणि निती मोहन हे या सिझनचे परीक्षक होते. तर कॉमेडियन भारती सिंह या कार्यक्रमाची सूत्रसंचालिका होती. गेल्या तीन महिन्यांपासून ही शो प्रेक्षकांचं मनोरंजन करत होता.
View this post on Instagram
सोशल मीडियावरही नेटकऱ्यांकडून जेटशेनवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ‘संगीत विश्वाला नवीन सुनिधी चौहान भेटली’ असं एका युजरने म्हटलंय. तर ‘लिटिल रॉकस्टार’ असं दुसऱ्याने लिहिलं आहे.
“माझं स्वप्न पूर्ण झालं आहे. खरं सांगायचं झालं तर माझ्यासाठी हे खूप कठीण होतं. कारण या सिझनचे सर्वच स्पर्धक अत्यंत प्रतिभावान आहेत. त्यांच्यासोबत मला स्टेज शेअर करायची संधी मिळाल्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे. या प्रवासादरम्यान मला बरंच काही शिकायला मिळालं”, अशा शब्दांत जेटशेनने कृतज्ञता व्यक्त केली.