प्रथमेश लघाटे-मुग्धा वैशंपायनचे सूर कसे जुळले? जाणून घ्या दोघांची ‘प्यारवाली लव्हस्टोरी’
जवळपास गेल्या चार वर्षांपासून प्रथमेश आणि मुग्धा एकमेकांना डेट करत आहेत. विशेष म्हणजे या दोघांच्या रिलेशनशिपबद्दल कुटुंबीयांना कल्पना होतीच. मुग्धाचं शिक्षण पूर्ण झाल्यावर घरी सांगायचं असं त्यांनी ठरवलं होतं.
मुंबई : प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन ही सारेगमप लिटिल चॅम्प्स फेम जोडी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या जोडीने प्रेमाने जाहीर कबुली दिली. ‘मोदक’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रथमेशनं फेसबुकवर पोस्ट लिहित मुग्धासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं. ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली होती. तेव्हापासूनच प्रथमेश आणि मुग्धाचे सूर कसे जुळले, हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या दोघांनी लव्ह-स्टोरी उलगडून सांगितली.
सारेगमप लिटिल चॅम्प्स मराठीमुळेच मुग्धा आणि प्रथमेशची पहिल्यांदा भेट झाली आणि शोनंतर दोघांचे एकत्र गाण्याचे कार्यक्रमही झाले. या कार्यक्रमांदरम्यान दोघांच्या भेटीगाठी व्हायच्या. दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती आणि हळूहळू दोघांच्या मनात एकमेकांविषयी भावना निर्माण झाल्या. एकदा कार्यक्रमाची तालीम सुरु असताना दोघांमध्ये गप्पा रंगल्या होत्या. तेव्हा प्रथमेशने मुग्धाला प्रपोज केलं. प्रथमेश कधी ना कधी प्रपोज करणार, याची जाणीव मुग्धाला होती.
आपल्या प्रपोजलला मुग्धाचं काय उत्तर असेल, हेसुद्धा प्रथमेशला माहीत होतं. मात्र तरीही तिने होकार द्यायला तीन-चार दिवसांचा अवधी घेतला. अखेर एकेदिवशी तिने त्याला भेटायला बोलावलं आणि आपलं उत्तर होकारार्थी असल्याचं सांगितलं. जवळपास गेल्या चार वर्षांपासून प्रथमेश आणि मुग्धा एकमेकांना डेट करत आहेत. विशेष म्हणजे या दोघांच्या रिलेशनशिपबद्दल कुटुंबीयांना कल्पना होतीच. मुग्धाचं शिक्षण पूर्ण झाल्यावर घरी सांगायचं असं त्यांनी ठरवलं होतं. अखेर ठरवून दोघांनी एकाच वेळी आपापल्या कुटुंबीयांना सांगितलं.
View this post on Instagram
सारेगमप लिटिल चॅम्प्सपासून सुरु झालेला या दोघांचा प्रवास आता रिलेशनशिपपर्यंत येऊन पोहोचला आहे. आपल्या सुरेल आवाजाने घराघरात पोहोचलेल्या दोन सूरवीरांनी एकमेकांचा पार्टनर म्हणून स्वीकार केला आहे. या दोघांच्या निर्णयामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. प्रथमेश आणि मुग्धा हे सारेगमप लिटिल चॅम्प्समध्ये टॉप 5 पर्यंत पोहोचले होते. रोहित राऊत, आर्या आंबेकर आणि कार्तिकी गायकवाड यांच्यासोबत या दोघांनी टॉप 5 पर्यंत बाजी मारली होती. हे पाचही जण पंचरत्न म्हणून ओळखले जाऊ लागले.