26 वर्षांनी लहान मुलीशी ‘स्टाइल’ फेम अभिनेत्याचं दुसरं लग्न; वयातील अंतराबद्दल स्पष्टच म्हणाला..
'स्टाइल' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता साहिल खान याने त्याच्यापेक्षा वयाने 26 वर्षांनी लहान असलेल्या मुलीशी दुसरं लग्न केलं. वयातील अंतराबद्दल तो नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाला.

‘स्टाइल’ या चित्रपटातील हिरो साहिल खान याने 9 फेब्रुवारी रोजी दुबईत आर्मेनियामध्ये जन्मलेला मिलेना ॲलेक्झांड्राशी लग्न केलं. लग्नानंतर 14 फेब्रुवारी रोजी ‘व्हॅलेंटाइन डे’ला त्यांनी बुर्ज खलिफा याठिकाणी ग्रँड रिसेप्शनचं आयोजन केलं. साहिलचं हे दुसरं लग्न असून याआधी त्याने इराणी वंशाच्या नॉर्वेजियन अभिनेत्री नेगर खानशी पहिलं लग्न केलं होतं. मात्र या दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. 2004-05 मध्ये दोघं फक्त दहा महिन्यांपुरते विवाहित होते. आता साहिलचं दुसरं लग्न त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या वयातील अंतरामुळे विशेष चर्चेत आलं आहे. साहिल 48 वर्षांचा असून त्याची पत्नी मिलेना ही फक्त 22 वर्षांची आहे. या दोघांच्या वयात 26 वर्षांचं अंतर आहे. याबद्दल साहिलने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मौन सोडलंय.
‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत साहिल म्हणाला, “प्रेमाची परिभाषा ही वयाने ठरवता येत नाही आणि आमचंही तसंच काहीसं आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर एकमेकांना समजून घेणं आणि सोबत पुढे जाणं म्हणजेच प्रेम असं मिलेनाही वाटतं. मी जेव्हा मिलेनाला भेटलो तेव्हा ती फक्त 21 वर्षांची होती. मी लगेच तिच्याकडे आकर्षित झालो. मला वाटतं की आमची परस्पर भावना होती. तीसुद्धा माझ्याकडे आकर्षित झाली होती.”




“वयाने लहान असूनही मिलेना अत्यंत समजूतदार आणि आयुष्याबद्दल खोलवर समज असलेली मुलगी आहे. तिचे विचार अत्यंत स्पष्ट आहेत. आमच्या भविष्याबद्दल आम्ही अर्थपूर्ण संवाद साधला होता. त्यानंतरच आम्ही पुढचं पाऊल उचललं. एकमेकांच्या कुटुंबीयांशी ओळख करून दिल्यानंतर आम्ही साखरपुडा केला. आता आम्ही दोघंही लग्नानंतर खूप खुश आहोत. मला इतकंच म्हणायचं आहे की मिलेना ॲलेक्झांड्रा ही माझी पत्नी आहे आणि आम्ही एकमेकांसोबत आनंदी आहोत”, असं तो पुढे म्हणाला.
View this post on Instagram
मिलेनाशी भेट कशी झाली याविषयी साहिलने सांगितलं, “आम्ही रशियातील मॉस्को याठिकाणी पहिल्यांदा भेटलो. ती तिथे तिच्या आईसोबत एका रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी आली होती आणि मी माझ्या मित्रांसोबत गेलो होतो. मी तिला मॉडेलिंग फोटोशूटची ऑफर दिली. मात्र तिने ती नम्रपणे नाकारली. मला त्यात काही रस नाही, असं तिने सांगितलं. ती लग्नासाठी मुलगा शोधत होती. तिचा साधेपणा आणि प्रामाणिकपणा पाहून मी तिच्याकडे आकर्षित झालो. त्याचक्षणी मला समजलं होतं की मला तिच्याशी लग्न करायचं आहे. तिथूनच आमच्या प्रेमकहाणीची सुरुवात झाली.”
साहिल खानने 2001 मध्ये ‘स्टाइल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये त्याच्यासोबत शर्मन जोशीनेही मुख्य भूमिका साकारली होती. 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एक्सक्युज मी’ या सीक्वेलमध्ये दोघांनी पुन्हा त्याच भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय साहिलने ‘अलादिन’, ‘डबल क्रॉस’, ‘रामा: द सर्वाइव्हर’ या चित्रपटांमध्येही काम केलं.