सैफच्या हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेनं कसली कंबर; 15 टिम्सकडून तपास सुरू
अभिनेता सैफ अली खानवर चाकूहल्ला करणाऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. याप्रकरणी तपासासाठी एकूण 15 टीम कार्यरत आहेत. सैफवर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
अभिनेता सैफ अली खानच्या घरात चोरीच्या उद्देशाने आलेल्या अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेनं कंबर कसली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या आठ टीम तपासात जुंपल्या आहेत. एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायकदेखील याप्रकरणी तपास करत असून सैफच्या निवासस्थानी ते पोहोचले आहेत. वांद्रे पोलीस ठाण्याने हल्लेखोरांच्या शोधासाठी सात टिम केल्या आहेत. अशा प्रकारे हल्लेखोरांच्या शोधासाठी मुंबई पोलिसांच्या एकूण 15 टीम कार्यरत आहेत. गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून सैफच्या इमारतीची तपासणी केली जात आहे.
सैफ अली खानच्या घरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून फ्लोअरिंग पॉलिशिंगच काम सुरू होतं. यातील कामगारांचीही पोलीस चौकशी करत आहेत. पोलिसांनी सैफच्या घराचे सीसीटीव्ही तपासले असता त्यात आत येताना आणि बाहेर जाताना कोणी दिसलं नाही. सैफवर हल्ला करणारा आरोपी चोरीच्या उद्देशानेच घरात आला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्या अनुषंगाने पोलीस घरात मागील आठवड्याभरात कामानिमित्त आलेल्या व्यक्तींची चौकशी करत आहेत. सैफच्या इमारतीच्या चौकीदाराच्या म्हणण्यानुसार घटनेच्या वेळी दोन अज्ञात लोक होते. सीसीटीव्हीमध्ये दोन अनोळखी व्यक्ती दिसले असून हे लोक कोण होते, ते का आले होते, याचा तपास पोलीस करत आहेत.
View this post on Instagram
वांद्रे पोलीस पथकाने सैफच्या घरी काम करणाऱ्या मोलकरीणीला पोलीस ठाण्यात आणलं असून तिची चौकशी केली जात आहे. जेव्हा अज्ञात व्यक्ती घरात शिरली, तेव्हा मोलकरीणीने सर्वांत आधी त्याला पाहिलं होतं आणि आरडाओरडा केला होता. त्यांचा आवाज ऐकल्यानंतर सैफ तिथे आला. त्यानंतर दोघांमध्ये हाणामारी झाली. यावेळी मोलकरीणीच्या हातालाही दुखापत झाली. इमारतीच्या मुख्य गेटजवळील सीसीटीव्हीमध्ये कोणीही येताना किंवा जाताना दिसलं नाही. ही घटना घडली तेव्हा सैफ, करीना आणि त्यांची दोन्ही मुलं घरातच होती.
सैफवर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे. त्याच्या शरीरावर एकूण सहा वार झाले असून त्यातील दोन वार खोलवर असल्याचं कळतंय. सैफवरील शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून त्याला गुरुवारी रात्रीपर्यंत डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. सैफच्या कुटुंबातील सर्व सदस्य सुरक्षित असून पोलीस घटनेचा तपास करत असल्याची माहिती, सैफच्या टीमकडून देण्यात आली.