चाकूहल्ल्यानंतर सैफला सर्वांत आधी ‘या’ व्यक्तीने पोहोचवलं रुग्णालयात
अभिनेता सैफ अली खानच्या घरात चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर चाकूहल्ला केला. या हल्ल्यात सैफच्या शरीरावर सहा जखमा झाल्या असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अभिनेता सैफ अली खानवरील चाकूहल्ल्याबाबत आणखी अपडेट्स समोर आल्या आहेत. तैमुर अली खान आणि जेह अली खान यांच्या रुममध्ये अज्ञात व्यक्तीने सैफवर चाकूहल्ला केल्याचं कळतंय. या घटनेवेळी सैफची पत्नी करीना कपूरसुद्धा घरातच होती. घरातील मोलकरणीने सर्वांत आधी चोराला मुलांच्या रुममध्ये पाहिलं. त्यानंतर तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली, तेव्हा सैफ उठून तिथे आला. त्याचवेळी चोराने सैफवर चाकूने हल्ला केला. ‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, सैफचा मोठा मुलगा इब्राहिम अली खानने त्याला सर्वांत आधी रुग्णालयात दाखल केलं. 23 वर्षीय इब्राहिम हा सैफ आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंहचा मुलगा आहे. तो सैफ आणि करीनासोबत राहत नसला तरी हल्ल्याबद्दल समजताच त्याने धाव घेतली आणि वडिलांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं.
गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनीही या घटनेबाबत महत्त्वाचा खुलासा केला. सैफच्या घरात शिरलेला चोर हा लिफ्ट किंवा इमारतीच्या मुख्य लॉबीमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला नाही. त्यामुळे इमारतीच्या शाफ्टमधून तो चोर बारा मजले चढून गेला असावा, अशी शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. चोराने सर्वांत आधी घराच्या मागे असलेल्या मोलकरणीच्या रुममध्ये प्रवेश केला. तिथे स्टाफसोबत धक्काबुक्की केल्यानंतर त्याने स्वत:ला मुलांच्या खोलीत बंद करून घेतलं. मात्र सैफवर चाकूहल्ला केल्यानंतर तिथून पळ काढण्यात तो यशस्वी ठरला. इमारतीच्या मागच्या बाजूची सुरक्षा भिंत फारशी उंच नसून तिथे फक्त एकच वॉचमन असल्याचंही तपास अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं.
View this post on Instagram
सैफवर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे. त्याच्या शरीरावर एकूण सहा वार झाले असून त्यातील दोन वार खोलवर असल्याचं कळतंय. सैफवरील शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून त्याला गुरुवारी रात्रीपर्यंत डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. सैफच्या कुटुंबातील सर्व सदस्य सुरक्षित असून पोलीस घटनेचा तपास करत असल्याची माहिती, सैफच्या टीमकडून देण्यात आली.
सैफ अली खानची मोलकरीण अरियामा फिलिप्स उर्फ लीमा हिची पोलीस चौकशी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस सकाळपासून लीमाची चौकशी करत आहेत. कारण तिने आरोपीला पाहिलं होतं आणि तिने आरडाओरडा केल्यावर सैफ त्याच्या रुमबाहेर आला होता.