“मला सलीमचं घर कधीच मोडायचं नव्हतं..”; सलमान खानच्या आईविषयी बोलताना हेलन भावूक
सलीम खान आणि सलमा यांचं लग्न 1964 मध्ये झालं. या दोघांना सलमान खान, अरबाज खान, सोहैल खान आणि अलविरा खान ही चार मुलं आहेत. सलीम यांनी 1981 मध्ये अभिनेत्री हेलन यांच्याशी दुसरं लग्न केलं. हेलन आणि सलीम यांनी अर्पिता खानला दत्तक घेतलं.
मुंबई : 21 नोव्हेंबर 2023 | अभिनेत्री हेलन यांचा जन्म 21 नोव्हेंबर 1938 रोजी बर्मामधील रंगून इथं झाला. त्यांचं पूर्ण नाव हेलन ॲन रिचर्डसन खान असं आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी 70 वर्षांहून अधिक काळापासून काम केलं आहे. त्यांचा डान्सही आजही लोकप्रिय आहे. ‘शबिस्तान’ या चित्रपटातून त्यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात झाली. 1951 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील एका ग्रुप डान्सर्समध्ये त्या डान्सर म्हणून सहभागी झाल्या होत्या. मात्र हेलन यांनी आपल्या अप्रतिम नृत्याची विशेष छाप सोडली. म्हणूनच त्यांना सोलो डान्सचे ऑफर्स मिळू लागले होते. हेच त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरलं होतं. ‘चिन चिन चू बाबा..’ या गाण्यामुळे हेलन यांचं नशिब पालटलं.
चित्रपटांमध्ये काम करताना त्यांची भेट पटकथालेखक सलीम खान यांच्याशी झाली. सलीम यांनी हेलन यांना 50 आणि 60 च्या दशकात अनेक चित्रपटं मिळवून दिली. अशातच दोघांमधील मैत्री अधिक घट्ट होऊ लागली आणि एकेदिवशी सलीम यांनी हेलनसमोर प्रेमाची कबुली दिली. हेलनसुद्धा त्यांच्या प्रेमात आकंठ बुडाल्या होत्या. हेलन यांनी सलीम यांच्याशी लग्न केलं, मात्र त्या त्यांच्या दुसऱ्या पत्नी ठरल्या. त्याआधी सलीम यांनी सुशीला चरक यांच्याशी निकाह केला होता. पाच वर्षे डेट केल्यानंतर 1964 मध्ये सलीम यांनी सुशीला यांच्याशी लग्न केलं होतं. या दोघांना सलमान, सोहैल, अरबाज आणि अलवीरा ही चार मुलं आहेत. तर अर्पिता खानला त्यांनी दत्तक घेतलं.
View this post on Instagram
हेलन यांनी सलीम यांच्याशी प्रेमविवाह तर केला होता, पण सलमा यांना दुखावून त्या स्वत: खूप दु:खी होत्या. अरबाज खानच्या ‘द इन्विन्सिबल’ या शोमध्ये त्या याविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या होत्या. “मला सलीमचं घर कधीच मोडायचं नव्हतं. मी सलमा यांचा खूप आदर करायची. जेव्हा मी सलीम यांच्यासोबत कारमधून बँडस्टँड इथल्या त्यांच्या घरासमोर जायची, तेव्हा कारमध्ये लपून बसायचे. सलमा बाल्कनीमध्ये उभ्या असतील आणि मला पाहतील, अशी भीती मला होती. मला सलीमने बऱ्याच भूमिका मिळवून दिल्या होत्या. आमची मैत्री प्रेमात बदलली होती. सलमा खूप चांगल्या स्वभावाच्या आहेत, त्यामुळे आमच्या लग्नाचा स्वीकार करणं त्यांच्यासाठी खूप कठीण गेलं असेल. परंतु त्यांच्या कुटुंबाने माझा स्वीकार केला. त्यांनी मला सलीमपासून वेगळं करण्याचा प्रयत्न कधीच केला नाही”, असं सांगताना हेलन भावूक झाल्या होत्या.