सलमानचा सर्वांत फ्लॉप चित्रपट; दिग्दर्शकाने सोडलं काम, अभिनेत्रीला पुन्हा बॉलिवूडमध्ये मिळालं नाही काम
अभिनेता सलमान खानने बॉलिवूडमध्ये बरेच हिट चित्रपट दिले आहेत. मात्र त्याच्या चित्रपटांच्या यादीत काही फ्लॉप चित्रपटांचाही समावेश आहे. सलमानच्या करिअरमधील सर्वांत फ्लॉप चित्रपटाने देशभरात एक कोटी रुपयेसुद्धा कमावले नव्हते. या चित्रपटातील अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये पुन्हा काम मिळालंच नाही.
मुंबई : 2 डिसेंबर 2023 | बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात अभिनेता सलमान खानचे फक्त देशभरातच नाही तर जगभरात असंख्य चाहते आहेत. शाहरुख खान, आमिर खान आणि अक्षय कुमार यांना टक्कर देत तो गेल्या 30 वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. मात्र बॉक्स ऑफिसवर त्याच्या प्रत्येक चित्रपटाला यश मिळतंच असं नाही. आजवर त्याचे बरेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटले. पण त्यापैकी एका चित्रपटाची गोष्टच निराळी आहे. कारण गेल्या 25 वर्षांतील सलमानचा हा असा चित्रपट आहे, ज्याने देशभरात एक कोटी रुपयेसुद्धा कमावले नाहीत. सलमानच्या करिअरमधील हा सर्वांत मोठा चित्रपट आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार आहे.
सलमान खानच्या करिअरमधील सर्वांत फ्लॉप चित्रपट
2007 मध्ये अमेरिकन दिग्दर्शक विलार्ड कॅरोल भारतात आला होता आणि त्यावेळी त्याने काही बॉलिवूड चित्रपट पाहिले होते. तब्बल 150 हून अधिक चित्रपट बनवल्यानंतर त्याने एक क्रॉसओव्हर चित्रपट बनवण्याचा निर्धार केला. यासाठी त्याने ‘रेसिडेंट एव्हील’ आणि ‘डेस्टिनेशन’ फेम अभिनेत्री ॲली लार्टर आणि सलमान खान या दोघांची निवड केली. ॲलीसोबत विलार्डने आधीही काम केलं होतं. या चित्रपटाचं नाव होतं ‘मारिगोल्ड’. हा रोमँटिक ड्रामा एका अमेरिकन अभिनेत्रीबद्दल होता, जी भारतात फिरायला येते आणि इथल्या राजपुत्राला भेटते. मात्र या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. अखेर बॉक्स ऑफिसवर तो फ्लॉप ठरला. देशभरात या चित्रपटाने फक्त 90 लाख रुपयांची कमाई केली होती. त्यावेळी लार्टर ही अभिनेत्री जागतिक फिल्म इंडस्ट्रीत चांगलीच प्रसिद्ध होती. तरीसुद्धा चित्रपटाने जगभरात फक्त 2.29 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.
‘मारिगोल्ड’नंतर विलार्ड कॅरोल आणि ॲली लार्टरचं काय झालं?
मारिगोल्ड हा चित्रपट भारतात सुपरहिट व्हावा अशी दिग्दर्शक कॅरोलची फार इच्छा होती. मात्र प्रत्यक्षात असं घडू शकलं नाही. दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता म्हणून हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला. त्यानंतर गेल्या 16 वर्षांत त्याने कोणत्याच चित्रपटावर काम केलं नाही. तर दुसरीकडे ॲली लार्टरने नंतर हॉलिवूड टीव्ही शोजमध्ये काम केलं. पण मारिगोल्डनंतर तिने पुन्हा बॉलिवूडमध्ये काम केलं नाही.