Siddique Ismail | सलमानच्या ‘बॉडीगार्ड’ चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्दिकी यांचं निधन; कलाविश्वावर शोककळा
मल्याळम चित्रपटांशिवाय सिद्दिकी यांनी काही तमिळ, तेलुगू आणि हिंदी चित्रपटांचंही दिग्दर्शन केलं होतं. सलमान खानच्या 'बॉडीगार्ड' या सुपरहिट चित्रपटाचं दिग्दर्शन त्यांनी केलं होतं. यामध्ये सलमानसोबत करीना कपूरने मुख्य भूमिका साकारली होती.
कोची | 9 ऑगस्ट 2023 : सलमान खानच्या ‘बॉडीगार्ड’ या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्दिकी यांचं मंगळवारी निधन जालं. ते 69 वर्षांचे होते. 7 ऑगस्ट रोजी कार्डिॲक अरेस्टनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासूनच त्यांची प्रकृती गंभीर होती. कोची इथल्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिद्दिकी यांच्या प्रश्चात पत्नी सजिता आणि तीन मुली आहेत. सुमया, सारा आणि सुकून अशी त्यांच्या मुलींची नावं आहेत. कार्डिॲक अरेस्टनंतर सिद्दिकी यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना एक्स्ट्राकोर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशनवर (ECMO) ठेवण्यात आलं होतं. त्यांना यकृत संबंधित समस्याही होत्या. त्याचप्रमाणे त्यांच्यावर न्युमोनियाचेही उपचार सुरू होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.
सिद्दिकी यांचं पार्थिव कदवंथरा इथल्या राजीव गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सकाळी 9 ते 11.30 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर आज (बुधवारी) संध्याकाळी 6 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडतील.
कोण आहेत सिद्दिकी?
सिद्दिकी यांनी मल्याळम चित्रपटसृष्टीत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं होतं. लाल या त्यांच्या मित्रासोबत त्यांनी इंडस्ट्रीत एण्ट्री केली होती. 1983 मध्ये दिग्गज दिग्दर्शक फाजिल यांच्यासोबत त्यांनी काम केलं. या दोघांनी मल्याळम चित्रपटात अनेक हिट चित्रपट दिले. त्यात रामजी राव स्पिकिंग, इन हरिहर नगर, गॉडफादर आणि व्हिएतनाम कॉलनी यांचा समावेश आहे.
मल्याळम चित्रपटांशिवाय सिद्दिकी यांनी काही तमिळ, तेलुगू आणि हिंदी चित्रपटांचंही दिग्दर्शन केलं होतं. सलमान खानच्या ‘बॉडीगार्ड’ या सुपरहिट चित्रपटाचं दिग्दर्शन त्यांनी केलं होतं. यामध्ये सलमानसोबत करीना कपूरने मुख्य भूमिका साकारली होती. सिद्दिकी यांचा अखेरचा चित्रपट ‘बिग ब्रदर’ हा 2020 मध्ये प्रदर्शित झाला. यामध्ये सुपरस्टार मोहनलाल यांनी मुख्य भूमिका साकारली होती. त्यांच्यासोबत अरबाज खान, अनुप मेनन, विष्णू उन्नीकृष्णन, सर्जानो खालिद, हनी रोज, मिरना मेनन, चेतन हंसराज, गाढा सिद्धिकी आणि टिनी टॉम यांच्या भूमिका होत्या.