जीवे मारण्याच्या धमक्यांवर सलमान खान स्पष्टच बोलला.. “जेवढं वय..”
अभिनेता सलमान खान नुकत्याच एका कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना त्याला मिळणाऱ्या सततच्या जीवे मारण्याच्या धमक्यांविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. लॉरेन्स बिष्णोईकडून सलमानला सतत धमक्या दिल्या जातत आहेत. त्याच्या घराबाहेर गोळीबारसुद्धा झाला होता.

बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात अभिनेता सलमान खानला गेल्या काही वर्षांपासून सतत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. माजी मंत्री आणि एनसीपी नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर सलमानच्या जिवाला आणखीनच धोका निर्माण झाला. तेव्हापासून सलमानच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे. सलमान कुठेही गेला, तरी त्याच्या अवतीभवती पोलिसांचा आणि सुरक्षारक्षकांचा घेराव असतो. सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत असताना आणि घरावर गोळीबार झाला असतानाही सलमानने त्याच्या चित्रपटांचं काम थांबवलं नाही. शूटिंग असो किंवा प्रमोशन.. सलमान प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहिला. आता त्याचा ‘सिकंदर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त माध्यमांशी बोलताना सलमानने या धमक्यांवर प्रतिक्रिया दिली आहे.
धमक्यांवर प्रतिक्रिया
या जीवे मारण्याच्या धमक्यांची भीती वाटते का, याबद्दल सलमान म्हणाला, “भगवान, अल्लाह सब उनपर है, जितनी उमर लिखी है, उतनी लिखी है. बस यही है. कभी कभी इतने लोगों को साथ मै लेके चलना पडता है, बस वो ही प्रॉब्लेम हो जाती है (देव, अल्लाह सर्वकाही त्याच्यावर आहे. जेवढं वय जगायचं लिहिलंय, तेवढं लिहिलंय. फक्त हेच आहे की कधी कधी इतक्या लोकांना सोबत घेऊन राहावं लागतं, फक्त हीच एक समस्या आहे.)”
काळवीट शिकार प्रकरण
‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या शूटिंगरम्यान सलमानने काळवीट शिकार केल्याचा आरोप आहे. तेव्हापासूनच बिष्णोई गँगच्या निशाण्यावर सलमान आहे. काळवीट हा बिष्णोई समुदायाचा अत्यंत प्रिय प्राणी आहे. त्यामुळे त्याच्या शिकारीच्या वृत्ताने त्यांच्यात तीव्र नाराजी निर्माण झाली. 2018 मध्ये जोधपूरमधील कोर्टात सुनावणीदरम्यान गुंड लॉरेन्स बिष्णोई म्हणाला होता, “आम्ही सलमानला मारून टाकू. आम्ही कारवाई केल्यावर सर्वांनाच समजेल. आतापर्यंत तरी मी काही केलं नाही. ते विनाकारण माझ्यावर आरोप करत आहेत.” त्यानंतर एप्रिल 2024 मध्ये सलमानच्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट्स’बाहेर दोन अज्ञातांनी हवेत गोळीबार केला होता. याशिवाय सलमानच्या वडिलांनाही धमकीचं पत्र लिहिण्यात आलं होतं.




दरम्यान सलमान खानचा ‘सिकंदर’ हा चित्रपट येत्या ईदच्या मुहूर्तावर 30 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘गजिनी’ फेम ए. आर. मुरुगादोसने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. यामध्ये सलमानसोबत रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे.