सलमान खानचं 34 वर्षे जुनं पत्र व्हायरल; कोणासाठी लिहिलं होतं, ‘मी तुमच्यावर प्रेम करतो..’
सलमान खान आणि भाग्यश्री यांच्या मुख्य भूमिका असलेला 'मैंने प्यार किया' हा चित्रपट 29 डिसेंबर 1989 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील डायलॉग्स आणि गाणी आजही लोकप्रिय आहेत.
‘मैंने प्यार किया’ हा अभिनेता सलमान खानच्या करिअरमधील अत्यंत महत्त्वाचा चित्रपट होता. या चित्रपटातून अभिनेत्री भाग्यश्रीने सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं आणि या दोघांची जोडी त्यावेळी तुफान हिट ठरली होती. आजही हा चित्रपट चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर सलमानने स्वहस्ताक्षराने एक पत्र लिहिलं होतं. हे पत्र एका मॅगझिनमध्ये छापून आलं होतं. सलमानने लिहिलेलं तेच पत्र आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पत्रातून सलमानने चाहत्यांना आश्वासन दिलं होतं की तो नेहमी चांगले चित्रपट करून प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहणार. 1990 मधील या पत्राने आता पुन्हा एकदा सलमानच्या चाहत्यांचं लक्ष वेधलंय.
सलमानने पत्रात काय लिहिलं होतं?
सलमानने त्याच्या या पत्रात लिहिलं होतं, ‘माझ्याविषयी अशा काही गोष्टी आहे, ज्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत. सर्वांत पहिली गोष्ट म्हणजे तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. कारण तुम्ही माझा स्वीकार केला आणि माझे चाहते बनलात. माझ्या प्रत्येक चित्रपटातून मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करेन. मी फार विचारपूर्वक स्क्रिप्ट निवडतोय. मी फक्त सर्वोत्तम स्क्रिप्ट निवडण्यावर भर देतोय. कारण मला माहितीये की, यापुढे मी जे चित्रपट करेन, त्याची तुलना ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटाशी होईल. त्यामुळे यापुढे माझ्या चित्रपटाची घोषणा झाल्यास, तो चांगलाच असेल यावर चाहत्यांनी विश्वास ठेवावा. मी 100 टक्के मेहनत घेईन. माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि तुम्हीसुद्धा माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करत राहाल अशी अपेक्षा आहे. कारण ज्यादिवशी तुमच्याकडून प्रेम मिळणं बंद होईल, त्यादिवशी माझे चित्रपट बंद होतील आणि तोच माझ्या करिअरचा अंत असेल.’
View this post on Instagram
‘लक्षात ठेवा, तुमच्यासारख्या लोकांमुळेच आम्ही बनतो. माझ्या खासगी आयुष्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही, कारण ते तुम्हाला आधीपासूनच माहित आहे. लोकांना असं वाटतं की मी या चित्रपटात काहीतरी कमाल केली आहे. पण मी असं मानत नाही. मला असं वाटतं की माझं स्थान अद्याप मला निर्माण करायचं आहे. मला सध्या एकच गोष्ट माहित आहे आणि ती म्हणजे तुम्ही माझा स्वीकार केला आहे. धन्यवाद’, अशा शब्दांत तो या पत्रातून व्यक्त झाला.