Samantha | समंथाने उपचारासाठी अभिनेत्याकडून केली कोट्यवधींची उधारी? अभिनेत्रीने सोडलं मौन
मायोसिटीस या आजारामुळे समंथाच्या आरोग्यावर बराच परिणाम झाला आहे. उपचारानंतर जेव्हा जेव्हा ती माध्यमांसमोर किंवा कॅमेरासमोर आली, तेव्हा हा परिणाम तिच्या चेहऱ्यावर अनेकदा पहायला मिळाला. याच आजारामुळे आता तिने अभिनयातून ब्रेक घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
मुंबई | 5 ऑगस्ट 2023 : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडल्यानंतर समंथाने बॉलिवूडमध्येही आपली ओळख निर्माण केली. मात्र मायोसिटीस या आजाराचं निदान झाल्यानंतर समंथाच्या करिअरला ब्रेक लागला. आरोग्यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी तिने कामातून काही काळासाठी ब्रेक घेतला. या आजारावरील उपचारासाठी समंथाने एका तेलुगू अभिनेत्याकडून मदत घेतल्याच्या चर्चांना उधाण आलं. या अभिनेत्याने तिला 25 कोटी रुपयांची मदत केल्याचं म्हटलं गेलं होतं. आता त्यावर खुद्द समंथाने मौन सोडलं आहे. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिने एक पोस्ट लिहिली आहे.
समंथाला कोणी मदत केली?
‘मायोसिटीसवरील उपचारासाठी 25 कोटी रुपये? कोणीतरी तुम्हाला खूप वाईट डील दिली आहे वाटतं. सुदैवाने मी त्यापैकी खूप छोटी रक्कम खर्च करत आहे आणि मला वाटत नाही की माझ्या करिअरमध्ये मी आतापर्यंत केलेल्या कामासाठी मला फक्त दगडीच मिळाली आहेत. त्यामुळे मी माझी काळजी आरामात घेऊ शकते. धन्यवाद. मायसिटीस या आजाराने हजारो लोक ग्रस्त आहेत. त्यामुळे त्याच्या उपचाराविषयी काहीही बोलताना जबाबदारपूर्ण वागा’, असं तिने लिहिलं आहे.
2022 या वर्षी समंथाला मायोसिटीस या आजाराचं निदान झालं. या आजारावरील उपचारासाठी तिने भरपूर पैसे खर्च केल्याचं म्हटलं जात होतं. मायोसिटिस ही आरोग्याची अशी एक स्थिती आहे ज्यामध्ये स्नायूंमध्ये तीव्र वेदना होतात. मायो म्हणजे स्नायू आणि आयटीस म्हणजे जळजळ (वेदना). याला व्हायरल इन्फेक्शन, विशिष्ट औषधं आणि स्वयं रोगप्रतिकार शक्ती अशी विविध कारणं कारणीभूत असू शकतात.
मायोसिटीस या आजारामुळे समंथाच्या आरोग्यावर बराच परिणाम झाला आहे. उपचारानंतर जेव्हा जेव्हा ती माध्यमांसमोर किंवा कॅमेरासमोर आली, तेव्हा हा परिणाम तिच्या चेहऱ्यावर अनेकदा पहायला मिळाला. याच आजारामुळे आता तिने अभिनयातून ब्रेक घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. जवळपास वर्षभर ती कोणत्याच प्रोजेक्टवर काम करणार नसून फक्त तिच्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत करणार आहे. यासाठी तिने आगामी चित्रपटांसाठी घेतलेली ॲडव्हान्स रक्कमसुद्धा निर्मात्यांना परत केल्याचं समजतंय.
या वर्षभरातील काळात समंथा कोणताच तेलुगू किंवा बॉलिवूड चित्रपट स्वीकारणार नाही. त्याऐवजी आपलं संपूर्ण लक्ष ती आरोग्यावर देणार आहे. मायोसिटीस या आजारावर ती पुढील उपचार घेणार असल्याचं कळतंय. त्यामुळे निर्मात्यांकडून घेतलेली ॲडव्हान्स रक्कम तिने परत केली आहे.