Kranti Redkar | “मी समीरचा रक्ताने माखलेला शर्ट..”; आरोप करणाऱ्यांना क्रांती रेडकरचं सडेतोड उत्तर
"जेव्हा ते सर्व घडत होतं, तेव्हा क्रांतीला माझ्यासोबत खंबीरपणे उभं राहिल्याचं पाहून मी खूप खुश होतो. मी मृत्यूला घाबरत नाही आणि मी क्रांतीला हे सांगितलं आहे की मला काही झालं तर ती माझ्या मुलींचा सांभाळ करण्यास सक्षम आहे," असं वानखेडे म्हणाले.
मुंबई | 24 ऑगस्ट 2023 : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) माजी विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी-अभिनेत्री क्रांती रेडकर नुकतेच एका पॉडकास्ट शोमध्ये झळकले. अमृता राव आणि आरजे अनमोल यांच्या पॉडकास्टमध्ये दोघं खासगी आयुष्याविषयी आणि इतरही महत्त्वाच्या मुद्द्यांवर मोकळेपणे व्यक्त झाले. समीर यांच्या कामाबद्दल बोलताना क्रांती म्हणाली, “जेव्हा लोक दुसरी बाजू न पाहताच आणि त्याच्या कामाची पद्धत न पाहता विविध आरोप करतात तेव्हा मला फार वाईट वाटतं.”
क्रांती पुढे म्हणाली, “माझा मेहुणासुद्धा पोलीस दलात कार्यरत आहे. एके दिवशी तो समीरसोबत डोंगरी याठिकाणी एका ऑपरेशनसाठी गेलो होता. जेव्हा तो घरी परतला, तेव्हा तो सुन्न झाला होता. त्याने मला सांगितलं की समीरला पुढे जाऊन आणि फ्रंट फूटला राहून टीमला नेतृत्त्व करण्यास सांगू नका. तो मला म्हणत होता, क्रांती प्लीज समीरला सांग की पुढे जाऊ नकोस. फक्त एक बुलेट पुरेशी आहे. त्याला थोडं मागे राहण्यास सांगा. तो अशा लोकांसमोर थेट जातो ज्यांच्या हातात विविध शस्त्रे असतात. मग अशा वेळी जेव्हा ठराविक असमर्थ लोक त्याच्यावर खंडणीचा आरोप करतात, तेव्हा मला वाईट वाटतं.”
View this post on Instagram
“मी समीरचा रक्ताने माखलेला शर्ट आणि फाटलेली पँट साफ केली आहे. मी त्याच्या बुटातील चिखल साफ केला आहे. मी त्या सर्व गोष्टींची साक्षीदार आहे. त्याचं काम अभूतपूर्व आहे”, अशा शब्दांत क्रांती व्यक्त झाली. या मुलाखतीत समीरसुद्धा एनसीबीमध्ये असताना त्यांच्या आयुष्यातील खडतर टप्प्याबद्दल व्यक्त झाले. आर्यन खान प्रकरणानंतर त्यांच्यावर करण्यात आलेल्या विविध आरोपांबद्दल ते स्पष्टपणे बोलले.
“जेव्हा ते सर्व घडत होतं, तेव्हा क्रांतीला माझ्यासोबत खंबीरपणे उभं राहिल्याचं पाहून मी खूप खुश होतो. मी मृत्यूला घाबरत नाही आणि मी क्रांतीला हे सांगितलं आहे की मला काही झालं तर ती माझ्या मुलींचा सांभाळ करण्यास सक्षम आहे. म्हणूनच मी पुढे जातो आणि फ्रंट फूटला राहून काम करतो”, असं वानखेडे म्हणाले.