Satish Kaushik | 15 कोटी रुपयांसाठी सतीश कौशिक यांना जीवे मारल्याचा आरोप; कोण आहेत विकास मालू?
अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्यांनी ज्या फार्महाऊसमध्ये पार्टी केली, त्याचे मालक कुबेर ग्रुपचे विकास मालू आहेत. विकास मालू यांच्या पत्नीने आता धक्कादायक आरोप केले आहेत.
मुंबई : दिवंगत अभिनेत, दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. सतीश यांनी ज्या फार्महाऊसमध्ये पार्टी केली होती, त्याचे मालक कुबेर ग्रुपचे विकास मालू आहेत. आता विकास मालू यांच्या पत्नीने सतीश कौशिक यांच्या निधन प्रकरणात धक्कादायक आरोप केले आहेत. माझ्या पतीनेच कौशक यांना जीवे मारलं, असा आरोप सान्वी मालूने केला आहे. सान्वीने या प्रकरणात दिल्ली पोलीस आयुक्तांना चिठ्ठी लिहिली आहे.
सतीश कौशिक यांच्यासोबत झाला वाद
विकास मालू यांची पत्नी सान्वी मालूने दिल्ली पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहून सतीश कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणात पती विकास मालू यांचा हात असल्याची शंका वर्तवली आहे. सान्वीने लिहिलं की विकास यांचं सतीश यांच्यासोबत 15 कोटी रुपयांवरून वाद झाला होता. सतीश आणि विकास हे एकमेकांचे जुने मित्र असल्याचंही तिने लिहिलंय. परदेशात एकदा सतीश विकासकडून त्यांचे 15 कोटी रुपये घेण्यासाठी आले होते, मात्र दोघांमध्ये वाद झाला. नंतर पैसे देतो असं सांगून विकास यांनी ती गोष्ट टाळली.
विकास यांनीच सतीश यांना चुकीची औषधं खायला दिली असावीत जेणेकरून त्यांना पैसे द्यायची गरज पडू नये, असा आरोप सान्वीने केला आहे. त्याचसोबत या प्रकरणात चौकशीचीही तिने मागणी केली.
विकास यांच्यावर बलात्काराचा गुन्हा
सान्वीने तिच्या पतीविरोधात दोन महिन्यांपूर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे सान्वीच्या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे, हे तपासानंतरच स्पष्ट होऊ शकेल. दुसरीकडे कौशिक यांच्या कुटुंबीयांनी कोणताच संशय व्यक्त केला नाही. त्याचप्रमाणे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्येही घातपाताची शक्यता आढळली नाही. सतीश कौशिक यांचं निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं म्हटलं जात होतं.
कोण आहेत विकास मालू?
विकास मालू आणि सतीश कौशिक यांची मैत्री फार जुनी आहे. विकास मालू हे व्यावसायिक आहेत आणि त्यांच्या कंपनीचं नाव कुबेर ग्रुप आहे. विकास हे सतीश यांचे फॅमिली फ्रेंडसुद्धा आहेत. त्यांना अनेकदा कौशिक यांच्यासोबत पाहिलं गेलंय. होळीच्या पार्टीला हजेरी लावण्यासाठी सतीश कौशिक हे खासकरून मुंबईहून गुरुग्रामला निघाले होते. फार्महाऊसवर झालेल्या होळी पार्टीत बरेच इतर बिझनेसमनसुद्धा सहभागी झाले होते.
सतीश कौशिक यांचं 9 मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर मुंबईत 10 मार्च रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनुपम खेर, अभिषेक बच्चन, रणबीर कपूर, जॉनी लिव्हर, जावेद अख्तर, बोनी कपूर, पंकज त्रिपाठी यांसारख्या कलाकारांनी आपल्या लाडक्या सहकलाकाराला अंतिम निरोप देण्यासाठी एकच गर्दी केली होती.