अंबानींच्या लग्नसोहळ्यावर मराठी अभिनेत्याची उपरोधिक पोस्ट; म्हणाला ‘जय गनेस!’
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शाही लग्नसोहळ्याविषयी एका मराठी अभिनेत्याने उपरोधिक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. अनंत आणि राधिका हे 12 जुलै रोजी मुंबईत लग्नबंधनात अडकले.
देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीने शुक्रवारी 12 जुलै रोजी राधिका मर्चंटशी लग्नगाठ बांधली. गेल्या काही महिन्यांपासून हा लग्नसोहळा चर्चेत आहे. भव्यदिव्य प्री-वेडिंग कार्यक्रमांनंतर अत्यंत शाही अंदाजात अनंत-राधिका विवाहबंधनात अडकले. ‘वेडिंग ऑफ द इअर’ म्हणून संबोधल्या गेलेल्या या लग्नसोहळ्यात देश-विदेशातील मान्यवर उपस्थित होते. अनेक सेलिब्रिटी त्यांच्या ग्लॅमरस अंदाजात अंबानींच्या कार्यक्रमांना पोहोचले होते. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या लग्नाचेच फोटो आणि व्हिडीओ पहायला मिळत आहेत. अशातच एका मराठी अभिनेत्याने अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्याबद्दल उपरोधिक पोस्ट लिहिल्या आहेत. त्याच्या या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
अभिनेत्याची उपरोधिक पोस्ट-
अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्याबद्दल अभिनेता सौरभ गोखलेनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट लिहिल्या आहेत. यात त्याने अंबानींच्या संगीत कार्यक्रमाची खिल्ली उडवली आहे. ‘आज एका धनाढ्य कुटुंबातील लग्नसमारंभातील कुटुंबीयांचा नृत्याविष्कार पाहून मला माझ्या छोट्या नुमवि शाळेतील स्नेहसंमेलनातील आमचा नाच आठवला. फरक इतकाच की आम्ही ‘विद्यार्थी’ होतो आणि त्यांना ‘अर्थ-विद्या’ उत्तम येते’, असं लिहित त्याने हसण्याचे इमोजी पोस्ट केले. दुसऱ्या पोस्टमध्ये त्याने लिहिलं, ‘येत्या गणेशोत्सवाच्या आराशीसाठी नुकत्याच उरकलेल्या लग्नसमारंभातील सेट/कपडे इत्यादी भाड्याने किंवा विकत मिळतील.. संपर्क: पेडर रोडला येऊन एक हाक मारा.. || जय गनेस ||’ दरम्यान सौरभने ‘राधा ही बावरी’, ‘उंच माझा झोका’ या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. सौरभ रंगभूमीवरही कार्यरत आहे.
अमिताभ आणि जया बच्चन यांचे आशीर्वाद घेणारा शाहरुख खान, रजनीकांत, अनील कपूर आणि रणवीर सिंहचा भन्नाट डान्स, अशी अनेक दृश्ये अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यात पहायला मिळाली. वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) जिओ वर्ल्ड ड्राइव्ह इथं पार पडलेल्या या सोहळ्याला चित्रपट, राजकीय, क्रीडा तसंच इतर क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती पहायला मिळाली. सोशल मीडियावरही या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल झाले.
अमिताभ आणि जया बच्चन, अभिषेक बच्चन-ऐश्वर्या राय, शाहरुख आणि गौरी खान, तमिळ सुपरस्टार रजनीकांत, हॉलिवूड अभिनेता आणि डब्ल्युडब्ल्युई फेम जॉन सीना, सलमान खान, संजय दत्त, अर्जुन कपूर, माधुरी दीक्षित, रणबीर कपूर-आलिया भट्ट, विकी कौशल-कतरिना कैफ, प्रियांका चोप्रा-निक जोनास, सचिन तेंडुलकर, महेंद्र सिंह धोनी, बाबा रामदेव, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी यांसह इतर अनेक मान्यवर या लग्नसोहळ्यात सहभागी झाले होते.