Sayaji Shinde | सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला; पुणे-बँगलोर महामार्गावर घडली घटना
सयाजी शिंदे हे त्यांच्या दमदार अभिनयासोबतच झाडांबद्दलच्या प्रेमासाठीही प्रसिद्ध आहेत. सह्याद्री देवराई प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते राज्यात अनेक ठिकाणी वृक्ष लागवडीचे उपक्रम राबवतात.
पुणे : अभिनेते सयाजी शिंदे त्यांच्या देवराई या संस्थेअंतर्गत अनेक सामाजिक कार्य करत असतात. नुकतंच ते पुणे- बेंगळुरू महामार्गावरील वृक्षांचं पुनर्रोपण करत होते. मात्र यावेळी त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला. पुणे- बेंगळुरू महामार्गाचं रुंदीकरण सुरू असल्याने तिथली झाडं वाचवण्यासाठी ते तासवडे इथं उपस्थित होते. त्याचवेळी त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर सयाजी शिंदे यांना लगेचच गाडीमध्ये बसवण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती समोर येत आहे.
महामार्गाचं रुंदीकरण करताना बऱ्याच झाडांची कत्तल होते. मात्र यात जी झाडं वाचली आहेत, त्यांची शास्त्रीय पद्धतीने काटछाट करून पुन्हा पुनर्रोपण केलं पाहिजे, अशी भूमिका सयाजी शिंदे यांनी घेतली आहे. याच कामासाठी हे पुणे- बेंगळुरू महामार्गावर उभे होते. त्याच दरम्यान त्यांच्यावर मधमाशांचा हल्ला झाला. सुदैवाने आता ते सुखरुप आहेत.
“झाडांचं पुनर्रोपण करताना माझ्यावर काही मधमाशांचा हल्ला झाला. मानेजवळ थोडंसं सुजलंय. पण मी बरा आहे, काळजी करण्याचं कारण नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
सयाजी शिंदे हे त्यांच्या दमदार अभिनयासोबतच झाडांबद्दलच्या प्रेमासाठीही प्रसिद्ध आहेत. सह्याद्री देवराई प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते राज्यात अनेक ठिकाणी वृक्ष लागवडीचे उपक्रम राबवतात. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी झाडांची कत्तल होते, त्याठिकाणी ते स्वत: पुढाकार घेऊन ही कारवाई थांबवण्याचा प्रयत्न करतात. एरवी चित्रपटात आणि चंदेरी दुनियाच्या पडद्यावर आपण सयाजी शिंदे यांना खलनायकाच्या भूमिकेत पाहात आलो आहोत. मात्र विविध त्यांचं वृक्षप्रेमसुद्धा तितकंच चर्चेत असतं. विविध उपक्रमांमध्ये त्यांच्यातील वृक्षप्रेम आणि त्यासाठीची धडपड सर्वांनाच पाहायला मिळते.
निसर्गप्रेमाखातर हे परोपकाराचं काम करत असतानाच वेळप्रसंगी ते सरकारवर ताशेरेही ओढतात. “महाराष्ट्रात होत असलेली वृक्ष लागवड हे केवळ एक नाटक आहे. राज्यात होणाऱ्या 5 कोटी वृक्ष लागवडीची मोहीम हे निव्वळ एक थोतांड आहे. वृक्ष लागवडीच्या मोहीमेतून भ्रष्टाचाराला खतपाणी घातलं जात आहे. त्याच खड्ड्यात वृक्षांची लागवड केली जाते,” अशी टीका त्यांनी सरकारवर केली होती.
सयाजी शिंदे हे लवकरच ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये त्यांच्यासोबत नागराज मंजुळे, आकाश ठोसर यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन नागराज मंजुळे आणि हेमंत आवताडे यांनी केलं आहे.