माणसातला देवमाणूस..; सयाजी शिंदेंच्या दिलदारपणाचा व्हिडीओ व्हायरल, नेटकऱ्यांकडून कौतुक
अभिनेते सयाजी शिंदे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओवरून त्यांचं नेटकरी भरभरून कौतुक करत आहेत. सुरुवातीला ते फोनवरून त्यांच्या एका शालेय मित्राशी बोलत असतात. त्यानंतर ते त्याची भेट घेतात.

अभिनेते सयाजी शिंदेंचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये ते फोनवरून एका जुन्या मित्राशी बोलताना दिसत आहेत. सातवीतल्या या मित्राला ते विमानाने त्यांचं शूटिंग पहायला नेण्याविषयी विचारतात. त्यांचा हा संवाद आणि त्यानंतर मित्राची घेतलेली त्यांनी भेट.. हे सर्व काही पाहून नेटकरी सयाजींचं तोंडभरून कौतुक करत आहेत. सेलिब्रिटी झाल्यावर लोक आपल्या माणसांनाही विसरतात, परंतु सयाजींनी 50 वर्षांपूर्वीच्या मित्रालाही लक्षात ठेवलंय, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी त्यांची स्तुती केली आहे.
सयाजी शिंदेंचा व्हिडीओ-
या व्हिडीओमध्ये सयाजी त्यांच्या मित्रासोबत फोनवरून संवाद साधतात. “मला कलकत्त्याला शूटिंगला जायचंय, एका पंजाबी फिल्मसाठी. आज दुपारी जायचंय पुण्यावरून. तिकडे येतोस का कलकत्त्याला? तीन दिवस तिकडे राहायचंय. आजचा चौथा दिवस. दोन-चार दिवसांनी यायचं परत. इथून पुण्याला, पुण्यावरून कलकत्त्याला आणि कलकत्त्यावरून शांती निकेतन. तिकडे एका पंजाबी फिल्मचं शूटिंग सुरू आहे. चल जरा मला अभिनय शिकवायला. मग सुनेला सांग माझ्या मोबाइलवर आधारकार्डचा फोटो पाठवायला आणि तू येणार का नाही ते मला अर्ध्या तासात कन्फर्म सांग. केदारला विचार बैल सांभाळशील का, खायला-प्यायला घालशील का आणि मग त्याप्रमाणे ठरवू आपण,” असं ते मित्राला म्हणतात.
व्हिडीओ पुढे सयाजी आणि त्यांच्या मित्राची भेट झाल्याचं दाखवलं गेलंय. त्यावेळी सयाजी म्हणतात, “किती वर्ष झाली रे सातवीला. सातवीला भेट झालेली त्याच्यावर आता भेटतोय. जवळपास आता 50 वर्षे झाली. काय करतोय तू आता? आम्ही आता चाललोय पहिल्यांदा.. विमानानं चाललोय.”




नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सयाजी शिंदेंच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ‘मुलगा मोठा अधिकारी झाला तर बापाला पण विचारत नाही. पण या माणसाने लहानपणाचे मित्र आजपर्यंत सांभाळले आहेत. माणसातला देवमाणूस’, असं एकाने लिहिलंय. तर ‘लोक सेलिब्रिटी झाल्यावर ओळख दाखवायला तयार नसतात, इथे स्वत:ला फोन करतोय. जमिनीवरचा माणूस’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘खरा जीवन जगतोय हा माणूस. शून्य गर्व आहे यांना. नाहीतर इतर कलाकारांना पहा’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी कौतुक केलंय. ‘हा आहे खरा कलाकार. श्रीमंत गरीब भेदभाव न करता मैत्री शब्दाचा अर्थ संपूर्ण विश्वाला दाखवून देणारा’, असंही चाहत्यांनी म्हटलंय.