शाहरुखसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी गमावला ट्विटरचा ‘ब्ल्यू टिक’; मात्र ‘या’ साऊथ स्टार्सवर इलॉन मस्क मेहेरबान
मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने लेगसी व्हेरिफाईड अकाऊंट म्हणजेच अनपेड अकाऊंट्सची ब्ल्यू टिक हटवली आहे. कंपनीचे मालक इलॉन मस्क यांनी याबाबतची घोषणा यापूर्वीच केली होती.
मुंबई : शुक्रवारी सकाळपासूनच ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची जोरदार चर्चा सुरू झाली. शाहरुख खान, सलमान खान, अमिताभ बच्चन, आलिया भट्ट यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींपासून ते राजकारणातील दिग्गजांपर्यंत अनेकांच्या ट्विटर अकाऊंटवरून व्हेरिफाईड ब्ल्यू टिक हटवण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्यांनाही मोठा झटका बसला आहे. हे सर्व कलाकार सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. मात्र असेही काही सेलिब्रिटी आहेत, ज्यांच्या अकाऊंटवरून ब्ल्यू टिक हटवली गेली नाही. यामध्ये साऊथ सेलिब्रिटींचा सर्वाधिक समावेश आहे.
ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी जाहीर केलं होतं की 20 एप्रिलपासून सर्व लेगसी व्हेरिफाइड अकाऊंट्सवरून ब्ल्यू टिक हटवली जाईल. आता या सुविधेसाठी त्यांना दर महिन्याला ठराविक रक्कम मोजावी लागणार आहे. त्यानुसार 21 एप्रिल रोजी सकाळीच बऱ्याच सेलिब्रिटींच्या आणि दिग्गजांच्या अकाऊंटवरून ब्ल्यू टिक गायब झाली.
कोणकोणत्या सेलिब्रिटींच्या अकाऊंटवरून ब्ल्यू टिक हटवली गेली?
ब्ल्यू टिक हटवल्या गेलेल्या अकाऊंट्समध्ये शाहरुख खान, सलमान खान, अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, अभिषेक बच्चन, हृतिक रोशन, बिपाशा बासू, अर्जुन रामपाल, अनुष्का शर्मा आणि फराह खान यांसारख्या सेलिब्रिटींचा समावेश आहे.
कोणत्या सेलिब्रिटींच्या अकाऊंटवरून ब्ल्यू टिक हटवली गेली नाही?
ट्विटर अकाऊंटवर ब्ल्यू टिक कायम राहणाऱ्या अकाऊंट्समध्ये अनुपम खेर, सोनम कपूर, दाक्षिणात्य अभिनेता सूर्या, महेश बाबू, ज्युनियर एनटीआर, एस. एस. राजामौली, नागार्जुन, राणा डग्गुबत्ती यांचा समावेश आहे.
ट्विटरने का हटवली ब्ल्यू टिक?
मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने लेगसी व्हेरिफाईड अकाऊंट म्हणजेच अनपेड अकाऊंट्सची ब्ल्यू टिक हटवली आहे. कंपनीचे मालक इलॉन मस्क यांनी याबाबतची घोषणा यापूर्वीच केली होती. 20 एप्रिलनंतर ज्यांनी पेड सब्सस्क्रिशन घेतले नाहीत, त्यांची ब्ल्यू टिक हटवली जाईल, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानुसार गुरुवारी रात्री 12 वाजल्यापासूनच ब्ल्यू टिक हटवण्यात आली आहे. त्यामुळे आता कुणालाही ब्ल्यू टिक हवी असेल तर दर महिन्याला ठराविक रक्कम द्यावी लागणार आहे. त्यामुळे आपल्या ट्विटरला ब्ल्यू टिक असल्याची शेखी मिरवणाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.
ब्ल्यू टिक कशी मिळणार?
यूजर्सला ब्ल्यू टिक हवा असेल किंवा आताची ब्ल्यू टिक कायम ठेवायची असेल तर त्याला ट्विटरवर ब्ल्यूचे सब्सक्रिप्शन घ्यावे लागेल. भारतात ट्विटर ब्ल्यूचे सब्सस्क्रिप्शन 650 रुपये एवढे आहे. मोबाईल यूजर्ससाठी दरमहिन्याला 900 रुपये मोजावे लागणार आहेत.