भलीमोठी भिंत, उंच प्रवेशद्वार.. एअरपोर्टसारखी सेक्युरिटी.. शाहरुखचा ‘मन्नत’ आतून कसा? अभिनेत्याकडून खुलासा
शाहरुख खानचा मुंबईतील ‘मन्नत’ बंगला हा चाहत्यांसाठी जणू पर्यटनस्थळच आहे. या बंगल्याला आतून पाहण्याची इच्छा सर्वसामान्यांसोबतच काही कलाकारांचीही असते. शाहरुखच्या 'डंकी'मध्ये भूमिका साकारलेल्या एका अभिनेत्याला मन्नत हा बंगला आतून पाहता आला. त्याचा अनुभव त्याने सांगितला.
मुंबई : 18 डिसेंबर 2023 | बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘डंकी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत भूमिका साकारलेला अभिनेता विक्रम कोच्चरने नुकतीच ‘मन्नत’ बंगल्याला भेट दिली. किंग खानच्या घरातला अनुभव कसा होता आणि त्याचा बंगला आतून कसा आहे, याविषयी तो एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाला. एअरपोर्टवर ज्याप्रकारची सुरक्षाव्यवस्था असते, तितकीच कडक सुरक्षा तपासणी शाहरुखच्या घरात एण्ट्री करण्यापूर्वी होत असल्याचा खुलासा विक्रमने केला. प्रत्येक गोष्ट मशीनमध्ये स्कॅन करून तपासली जाते.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विक्रम म्हणाला, “शाहरुख खानला पाहिल्यानंतर मी थक्कच झालो होतो. त्याला जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटणार होतो, तेव्हा त्याने आम्हाला त्याच्या मन्नत बंगल्यावर बोलावलं होतं. त्याचं घर खूपच सुंदर आहे आणि आम्ही लिफ्टमधून गेलो होते. घरात एण्ट्री करण्यापूर्वी सुरक्षेखातर बरीच तपासणी झाली होती. भलीमोठी भिंत, त्यानंतर मोठं प्रवेशद्वार, लॉबी आणि एअरपोर्टवर तपासणी होती त्याप्रकारची सुरक्षा तपासणी किंवा एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये जाण्यापूर्वी ज्याप्रकारची चेकिंग होते, तशीच तिथे होते. प्रत्येक गोष्ट स्कॅन केली जाते.”
View this post on Instagram
“आम्ही वर जेव्हा त्याच्या रुममध्ये गेलो, तेव्हा तो आमच्याशी खूप विनम्रतेने वागला. तो प्रत्येक व्यक्तीशी तितक्याच नम्रतेने वागतो. तो तेव्हाच झोपेतून उठला होता. त्याने आम्हा सर्वांची योग्यरित्या काळजी घेतली. शाहरुखमध्ये एक असा खास गुण आहे, ज्यामुळे त्याच्या आजूबाजूला असलेले लोक खूप कम्फर्टेबल होतात. तो खूप मोठा स्टार आहे, असं भासवत नाही. तुम्ही एखादी गोष्ट सुचवली, तर तो ऐकतो आणि चर्चा करण्यासही तयार असतो. शूटिंगदरम्यान अनेकदा तो सहकलाकारांचं ऐकतो आणि त्यानुसार करतो”, असंही तो पुढे म्हणाला. राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’ या चित्रपटात शाहरुखसोबतच तापसी पन्नू, विकी कौशल आणि बोमन इराणी यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या 21 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
1997 मध्ये शाहरुख जेव्हा ‘येस बॉस’ या चित्रपटाची शूटिंग करत होता, तेव्हा त्याची नजर मन्नत बंगल्यावर पडली. त्यावेळी ‘व्हिला विएना’ असं त्या बंगल्याचं नाव होतं. शाहरुखला हा बंगला इतका आवडला की त्याने तो खरेदी करण्याचा निर्णय घेतला. व्हिला विएना या बंगल्याचे मालक गुजराती व्यावसायिक नरीमन दुबाश होते. 2001 मध्ये किंग खाने जवळपास 13.32 कोटी रुपयांमध्ये तो बंगला विकत घेतला होता. आज त्याच मन्नत बंगल्यांची किंमत गगनाला भिडली आहे. या मन्नत बंगल्याचं इंटेरिअर डिझाइन खुद्द गौरी खानने केलं आहे.