‘समीर वानखेडेंना अद्दल घडवण्यासाठी..’; संसद भवनाच्या व्हिडीओवरून अभिनेत्याने शाहरुखवर साधला निशाणा
केआरकेच्या या ट्विटवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया आल्या आहेत. 'खरा पठाण कोण हे शाहरुखला समजलंय', असं एकाने लिहिलं. तर 'शाहरुखने योग्य संदेश दिला आहे', असं म्हणत दुसऱ्या युजरने किंग खानला पाठिंबा दिला.
मुंबई : नव्या संसद भवनाचं उद्घाटन रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. अभिनेता शाहरुख खानने सोशल मीडियावर या नव्या संसद भवनाचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये संसद भवनाची दिमाखदार इमारत पहायला मिळतेय. ‘आपल्या संविधानाच्या रक्षण करणारं, या महान राष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाचं प्रतिनिधित्व करणारं आणि त्यातील प्रत्येक व्यक्तीच्या विविधतेची रक्षा करणाऱ्या लोकांसाठी हे किती सुंदर नवीन घर आहे’, असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं. संसद भवनाच्या या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडमध्ये शाहरुखचा आवाजही ऐकायला मिळतोय. त्यावरून आता एका बॉलिवूड नेत्याने निशाणा साधला आहे.
समीर वानखेडे यांचा उल्लेख करत या अभिनेत्याने शाहरुख खानवर टीका केली आहे. ‘पहा या जगात प्रत्येक गोष्टीची किंमत आहे. समीर वानखेडे यांना अद्दल घडवण्यासाठी एसआरके साहेबांना काय काय करावं लागतंय’, असा टोला त्याने शाहरुखला लगावला. बॉलिवूडच्या किंग खानवर टीका करणारा हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी असून कमाल आर. खान ऊर्फ केआरके आहे.
केआरकेच्या या ट्विटवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया आल्या आहेत. ‘खरा पठाण कोण हे शाहरुखला समजलंय’, असं एकाने लिहिलं. तर ‘शाहरुखने योग्य संदेश दिला आहे’, असं म्हणत दुसऱ्या युजरने किंग खानला पाठिंबा दिला.
कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्जप्रकरणी एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ताब्यात घेतलं होतं. ड्रग्जप्रकरणात आर्यनला सोडविण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांकडे 25 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप वानखेडेंवर करण्यात आला आहे. या आरोपांवरील तपासासाठी एनसीबीचे माजी उपसंचालक ज्ञानेश्वर सिंह यांच्या नेतृत्वाखाली वानखेडेंची विभागीय चौकशी झाली. त्या चौकशीच्या रिपोर्टवरून सीबीआयने दोन दिवस समीर वानखेडेंची जवळपास पाच ते सहा तास चौकशी केली होती.
पहा ट्विट-
Dekho Iss Duniya Main Har Cheez Ki Keemat Hai. SRK Sahab Ko Samir Vankhede Ko Thikaane Lagane Ke Liye Kaya Kaya Karna Padd Raha Hai. https://t.co/npS4EfW8BJ
— KRK (@kamaalrkhan) May 28, 2023
आतापर्यंत सीबीआयकडून दोन वेळा वानखेडेंची चौकशी करण्यात आली आहे. यादरम्यान शाहरुख आणि वानखेडे यांच्यातील व्हॉट्सॲप चॅट्ससुद्धा लीक झाले होते. दोघांमध्ये आर्यन खानवरून झालेला संवाद या चॅटमधून उघड झाला होता. शाहरुखने आर्यनला तुरुंगात न डांबण्याची विनंती वानखेडेंकडे केली होती.