Pathaan : चार वर्षांनंतर पतीला मोठ्या पडद्यावर पाहून भावुक झाली गौरी खान
चार वर्षांनंतर 'पठाण' सिनेमातून अभिनेता शाहरुख खान याची मोठ्या पडद्यावर दमदार एन्ट्री; सिनेमा विक्रमावर विक्रम रचत असताना किंग खानची पत्नी झाली भावुक
Gauri Khan On SRK Pathaan : अभिनेता शाहरुख खान (shahrukh khan) स्टारर ‘पठाण’ सिनेमा २५ जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वी अभिनेत्री दीपिका पादुकोण हिच्या भगव्या बिकिनीमुळे सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. एवढंच नाही तर, अनेक संघटनांनी पठाण सिनेमाला विरोध केला. पण याचा बॉक्स ऑफिसवर कोणताही परिणाम झाला नाही. गेल्या तीन दिवसांपासून सिनेमा बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई करत आहे. शिवाय शनिवार आणि रविवार असल्यामुळे सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारतो हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. पठाण सिनेमाच्या यशानंतर अनेक चाहते आणि सेलिब्रिटी शाहरुख खान याचं कौतुक करत आहेत.
सर्वत्र शाहरुख आणि किंग खानच्या पठाण चर्चा रंगत असताना अभिनेत्याची पत्नी गौरी खान (Gauri Khan) देखील प्रचंड आनंदी आहे. पतीला मिळालेलं यश पाहून गौरी खान हिच्या डोळ्यात पाणी आलं. एका रिपोर्टनुसार, ‘पठाण’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर शाहरुख खान याने सक्सेस पार्टी ठेवली होती. या पार्टीसाठी अनेक सेलिब्रिटी किंग खानच्या मन्नतवर पोहोचले.
View this post on Instagram
पार्टीमध्ये आलेला प्रत्येक जण पठाण आणि शाहरुख खानचं कौतुक करतोय पाहून अभिनेत्याच्या पत्नीच्या डोळ्यात पाणी आलं. शाहरुख याने स्वतःला चार वर्ष मोठ्या पडद्यापासून कसं दूर ठेवलं हे फक्त आणि फक्त गौरीलाच माहिती आहे. पठाण सिनेमाच्या यशानंतर शाहरुख खानचे चाहते, कुटुंब आणि मित्र परिवार आनंद साजरा करत आहेत.
पहिल्या दिवशी सिनेमाने ५७ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. तर दुसऱ्या दिवशी सिनेमाने ७०.५ कोटी रुपयांपर्यंत मजल मारली. पठाण सिनेमा रोज नवे विक्रम रचत आहे. शाहरुख खानचा हा सर्वात मोठा हीट सिनेमा ठरला आहे. स्टार्सपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सगळेच शाहरुखच्या सिनेमाचं कौतुक करत आहेत.
बुधवारी पठाण सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला, सलग तीन दिवस पठाण सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंज करण्यात यशस्वी ठरत आहे. तीन दिवसांत सिनेमाने जवळपास १६० कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला आहे. शाहरुख खान याच्या पठाण सिनेमाने अनेक हीट सिनेमांचा रोकॉर्ड ब्रेक केल्यामुळे पठाण किती कोटी रुपयांचा गल्ला गोळा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.