‘तिला रणबीरचा शाप लागलाय..’; आलियाबद्दल असं का म्हणतायत नेटकरी?
आलिया भट्टला रणबीरचा शाप लागलाय, अशा शब्दांत नेटकऱ्यांकडून टीका होत आहे. यामागचं कारण आहे 'जिगरा' या चित्रपटाची होत असलेली कमी कमाई. आलियाचा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्याने आतापर्यंत कमाईचा 20 कोटींचाही आकडा पार केला नाही.
अभिनेत्री आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेल्या ‘जिगरा’ या चित्रपटाचा ट्रेलर जेव्हा प्रदर्शित झाला, तेव्हा प्रेक्षक खूप भारावले होते. या ट्रेलरमधील आलियाच्या दमदार अभिनयकौशल्याने चाहत्यांची मनं जिंकली होती. वसन बाला दिग्दर्शित या चित्रपटात आलियासोबत वेदांग रैनाने मुख्य भूमिका साकारली आहे. परदेशात तुरुंगात अडकलेल्या भावाची सुटका करण्यासाठी काहीही करायला तयार असलेल्या बहिणीची भूमिका आलियाने यामध्ये साकारली आहे. मात्र जेव्हा ‘जिगरा’ थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा प्रेक्षकांकडून त्यावर संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही फारशी कमाई केली नाही.
पहिल्या दिवशी ‘जिगरा’ने फक्त 4.25 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. हा आकडा आलियाच्या याआधीच्या चित्रपटांपेक्षा कितीतरी पटींनी कमी आहे. आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र: पार्ट वन शिवा’ आणि RRR या चित्रपटांनी पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर कमाईचे विक्रम रचले होते. किंबहुना ‘जिगरा’ हा आलियाचा गेल्या दहा वर्षांत सर्वाधिक कमी आकड्याने ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. 2014 मध्ये तिच्या ‘हायवे’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी 3.42 कोटी रुपयांची कमाई केली होती.
View this post on Instagram
एकीकडे कमाईचा आकडा कमी असताना दुसरीकडे ‘जिगरा’च्या शोला प्रेक्षकवर्गच नसल्याच्या चर्चांनाही उधाण आलंय. टी-सीरिजच्या भूषण कुमारची पत्नी आणि अभिनेत्री दिव्या खोसलाने चक्क रिकाम्या थिएटरचा फोटो शेअर केला होता. आलियाला हे अपयश का आलं, याबाबतच्या विविध कारणांची आता नेटकऱ्यांमध्ये चर्चा होऊ लागली आहे. हास्यास्पद बाब म्हणजे यासाठी काही नेटकरी आलियाचा पती आणि अभिनेता रणबीर कपूरला जबाबदार ठरवत आहेत. ‘रणबीरचा शाप आलियाला लागला आहे’, असं काही नेटकऱ्यांनी म्हटलंय.
‘रेडिट’वर एका युजरने याबाबत लिहिलंय, ‘आलियाला रणबीरचा शाप लागला आहे. हा अनुभव त्याच्या एक्स गर्लफ्रेंड्सनाही आला होता. हा माणूस खरंच पनौती आहे. त्याच्यासोबत राहिलेल्या गर्लफ्रेंड्सनाही याचा फटका बसला होता. गुड लक आलिया. रणबीरला डेट करताना त्याच्या गर्लफ्रेंड्सनाही असाच अनुभव आला होता. मात्र त्याच्याशी ब्रेकअप करताच त्यांच्या करिअरला चांगलं वळण मिळालं.’ या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी दीपिका पादुकोण आणि कतरिना कैफचीही उदाहरणं दिली. रेडिटवरील ही पोस्ट आणि त्यावरील कमेंट्स चर्चेचा विषय ठरत आहेत. ‘जिगरा’ या चित्रपटाने आतापर्यंत भारतात 16.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे.