Pathaan: भगव्या बिकिनीच्या वादावर संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य; “जर नंगा नाच…”
हा चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. देशातल्या काही शहरांमध्ये या चित्रपटाला जोरदार विरोध होत आहे. सेन्सॉर बोर्डानेही यातील 10 पेक्षा अधिक दृश्यांवर कात्री चालवली आहे.
मुंबई: अभिनेता शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटावरून सुरू झालेला वाद अद्याप शमला नाही. हा चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. देशातल्या काही शहरांमध्ये या चित्रपटाला जोरदार विरोध होत आहे. सेन्सॉर बोर्डानेही यातील 10 पेक्षा अधिक दृश्यांवर कात्री चालवली आहे. इतकंच नव्हे तर वादग्रस्त ‘बेशर्म रंग’ या गाण्यातूनही काही सीन्स हटवण्यास सांगितले आहेत. या वादादरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी ‘भगव्या बिकिनी’वरून सुरू असलेल्या वादावरही मत मांडलं आहे.
‘पठाण’ हा शाहरुख खानचा चित्रपट आहे, म्हणून त्यातील दृश्यांवर कात्री चालवली जातेय, असं राऊत म्हणाले. “वाद निर्माण करण्याची गरज नव्हती. अभिनेत्रीने भगव्या रंगाची बिकिनी घातली होती. देशात इतके मोठे प्रश्न आहेत. त्या प्रश्नांपासून लक्ष हटवण्यासाठी हे प्रश्न उपस्थित करू नका”, असं ते पुढे म्हणाले.
भगव्या बिकिनीवरून सुरू असलेल्या वादावर दिली प्रतिक्रिया
भगव्या बिकिनीवरून सुरू असलेल्या वादावर ते म्हणाले, “सेन्सॉर बोर्ड तुमची (भाजप) कठपुतली आहे. तुम्ही त्यातील सीन्सवर कात्री चालवली. यामुळे कात्री चालवली कारण तो शाहरुख खानचा चित्रपट आहे. हा जर पडद्यावर नंगा नाच सुरू असेल तर तुम्ही त्यावर निर्णय घेऊ शकता. मात्र जर फक्त कपड्याचा रंग भगवा आहे म्हणून तुम्ही सीनवर कात्री चालवली असेल तर हे चुकीचं आहे. यासाठी कारण याआधीही तुमच्याशी जोडलेल्या लोकांनी अशा पद्धतीचे कपडे घातले आहेत आणि तेच काम केलंय.”
‘बेशर्म रंग’ हे ‘पठाण’मधील पहिलं गाणं डिसेंबर महिन्यात प्रदर्शित झालं होतं. या गाण्यातील एका दृश्यात अभिनेत्री दीपिका पदुकोणने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केली होती. या भगव्या बिकिनीवर काही हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला आहे. भगव्या रंगाची बिकिनी घालून, बोल्ड सीन्स देऊन दीपिकाने सनातन धर्माचा अपमान केला, असा आरोप त्यांनी केला. यानंतर अनेक शहरांमध्ये ‘पठाण’ला विरोध केला गेला. काही ठिकाणी शाहरुख खानचे पुतळेही जाळण्यात आले.