Shiv Thakare | अब्दु रोझिक – एमसी स्टॅन यांच्यातील वादावर अखेर शिव ठाकरेनं सोडलं मौन, म्हणाला..
बिग बॉसच्या घरात जी मंडली बनली होती, त्यात शो संपल्यानंतर फूट पडल्याचं समोर येतंय. गेल्या काही दिवसांपासून अब्दु रोझिक आणि एमसी स्टॅन यांच्यातील वादाने प्रेक्षकांचं लक्ष वेधलंय. त्या वादावर आता शिव ठाकरेनं प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : ‘बिग बॉस 16’मध्ये बनलेल्या मंडलीमध्ये आता फूट पडताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मंडलीमधील अब्दु रोझिक आणि एमसी स्टॅन यांच्यात काही वाद सुरू असल्याचं पहायला मिळतंय. या दोघांमध्ये एका गाण्यावरून वाद सुरू आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्यात अब्दु रोझिकने हजेरी लावली होती. यावेळी त्याला मंडलीबद्दल प्रश्न विचारला असता तो म्हणाला, ‘मंडली खत्म’. त्याच्या या वक्तव्यानंतर बिग बॉसच्या घरात लोकप्रिय झालेली मंडली आता एकत्र राहिलेली नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे. याच मंडलीचा एक महत्त्वपूर्ण भाग असलेल्या शिव ठाकरेनं आता त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
या मंडलीत साजिद खान, अब्दु रोझिक, निमृत कौर आहलुवालिया, एमसी स्टॅन, शिव ठाकरे आणि सुंबुल तौकिर खान यांचा समावेश होता. शो संपल्यानंतरही या मंडलीतील सदस्यांमध्ये मैत्री पहायला मिळाली होती. अनेकदा ते पार्ट्यांमध्ये एकत्र दिसले. मात्र आता त्यांच्या मैत्रीत फूट निर्माण झाल्याचं म्हटलं जातंय.
याविषयी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शिव ठाकरेने प्रतिक्रिया दिली. “एक शब्द होता, ज्यावरून पूर्ण पिक्चर बनला. लोक त्याविषयी बोलतात कारण ते आम्हाला पसंत करतात. जेव्हा मला अब्दु आणि स्टॅन यांच्यातील भांडणाविषयी समजलं, तेव्हा मलासुद्धा धक्का बसला. मी दोघांना याविषयी विचारलं, मात्र तसं काहीच घडलं नाही.”
#AbduRozik – Stan cuts my call and switches off my phone as if i call him to promote my songs or project. Abdu supported him while his tough times in #BB16 and now stan just ignores !
Abdu exposing fake friendship by Stan. Don’t feel sad abdu ❤️ #BiggBosspic.twitter.com/HmhVjFdEc1
— ??????? ✧ (@medico_sane) March 18, 2023
एका छोट्याशा गैरसमजुतीमुळे हे सर्व झाल्याचं त्याने स्पष्ट केलं. “जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटता, तेव्हा अनेक गोष्टी घडतात. दोघांनी भांडण झाल्याच्या चर्चांवर नकार दिला. आमचा व्हॉट्स ॲपवर ग्रुप आहे आणि त्यात आम्ही सगळे बोलत असतो. आमची मंडली कधीच तुटणार नाही. लहानसहान तक्रारी असतील, पण त्यामुळे मंडली तुटणार नाही. जर एमसी स्टॅनचा शो नसता, तर तोसुद्धा पार्टीला आला असता. मात्र येत्या काही दिवसांत आम्ही लवकरच गेट-टुगेदर प्लॅन करू. यावेळी एमसी स्टॅनलाही आवर्जून बोलावू”, असं तो पुढे म्हणाला.
बिग बॉसचा सोळावा सिझन चांगलाच गाजला. एकीकडे सर्वांशी पंगा घेऊन प्रियांका चहर चौधरीने स्वतंत्र खेळाकडे लक्ष केंद्रित केलं. तर दुसरीकडे मैत्रीच्या नावाखातर काही स्पर्धकांनी मिळून मंडली बनवली. याच मंडलीच्या माध्यमातून हे स्पर्धक खेळात पुढे सरकले. मात्र या मंडलीमधील स्पर्धकांची मैत्री पाहून चाहते फार खुश झाले होते. बिग बॉसची ट्रॉफीसुद्धा मंडलीचा सदस्य एमसी स्टॅनने जिंकली.