श्रेयस तळपदेच्या सेक्रेटरीने दिली हेल्थ अपडेट; कधी मिळणार डिस्चार्ज?
अभिनेता श्रेयस तळपदे हृदयविकाराचा झटका आल्याने त्याला गुरुवारी संध्याकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर रात्री 10 वाजताच्या सुमारास अँजियोप्लास्टी करण्यात आली. श्रेयसच्या प्रकृतीबद्दल त्याच्या सेक्रेटरीने माहिती दिली असून त्याला लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
मुंबई : 15 डिसेंबर 2023 | अभिनेता श्रेयस तळपदेला गुरुवारी संध्याकाळी मुंबईतल्या अंधेरी इथल्या बेलेव्यू रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाचं शूटिंग संपवून घरी परतलेल्या श्रेयसला श्वास घेण्यास त्राण जाणवू लागल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याला हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्याच्यावर अँजियोप्लास्टी करण्यात आल्याची माहिती समोर आली. आता श्रेयसच्या सेक्रेटरीने त्याच्या आरोग्याविषयीची महत्त्वाची माहिती दिली आहे. श्रेयस ठीक असून त्याला उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्याची माहिती सेक्रेटरीने दिली. श्रेयसला एक-दोन दिवसांत डिस्चार्ज मिळणार असल्याचंही कळतंय. चित्रपटाचं शूटिंग संपवून घरी परतल्यानंतर काही वेळातच श्रेयसला अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती ठीक आहे.
रात्री 10 च्या सुमारास अँजियोप्लास्टी
“श्रेयसला संध्याकाळी उशीरा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि त्याच्यावर रात्री 10 वाजताच्या सुमारास अँजियोप्लास्टी करण्यात आली. सध्या त्याची प्रकृती ठीक असून त्याला लवकरच डिस्चार्ज देण्यात येईल”, अशी माहिती डॉक्टरांनी ‘इंडिया टुडे’ला दिली. ‘वेलकम टू द जंगल’ हा ‘वेलकम’ या फ्रँचाइजीमधील तिसरा चित्रपट आहे. याचं दिग्दर्शक अहमद खान करतोय. या चित्रपटात श्रेयससोबतच अक्षय कुमार, दिशा पटानी, सुनील शेट्टी, परेश रावल, रवीना टंडन, जॅकलीन फर्नांडिस, संजय दत्त, राजपाल यादव, किकू शारदा, दलेर मेहंदी, मिका सिंग, राहुल देव, मुकेश तिवारी, शारीब हाश्मी, झाकीर हुसैन आणि यशपाल शर्मा यांच्या भूमिका आहेत.
मराठीसोबतच हिंदीतही दमदार काम
47 वर्षीय श्रेयस हा मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीतही सक्रिय आहे. 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इकबाल’ या चित्रपटामुळे त्याला बॉलिवूडमध्ये विशेष ओळख मिळाली. त्याने ओम शांती ओम, गोलमाल रिटर्न्स, डोर आणि हाऊसफुल 2 यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. श्रेयस लवकरच कंगना रणौतच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तो भारताचे माजी दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणार आहे.