सलमान-अक्षयचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर का फ्लॉप होतायत? श्रेयसने सांगितलं खरं कारण
अभिनेता श्रेयस तळपदेनं बॉलिवूड चित्रपटांबाबत आपलं मत बिनधास्तपणे मांडलं आहे. मोठ्या स्टार्सचे प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट होईलच असं नाही, असं तो म्हणाला. सलमान आणि अक्षय कुमार यांचे चित्रपट का फ्लॉप होतायत, यामागचं त्याने कारण सांगितलं.
गेल्या काही वर्षांमध्ये बॉक्स ऑफिसवर मोठमोठ्या अभिनेत्यांचे चित्रपट दणक्यात आपटले. सलमान खान, अक्षय कुमार यांसारख्या सेलिब्रिटींच्या चित्रपटांनाही नुकसान सोसावं लागलं. सलमानचे ‘किसी का भाई किसी की जान’, ‘टायगर 3’ तर अक्षय कुमारचे ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘रामसेतू’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हे चित्रपट फ्लॉप ठरले. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता श्रेयस तळपदेनं यावर आपलं मत मांडलं आहे. सुपरस्टार्सच्या चाहत्यांची आवड दिवसेंदिवस बदलतेय आणि त्यांना तोच-तोचपणा नकोय, असं त्याने म्हटलंय.
आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत श्रेयस म्हणाला, “लोक आता थकले आहेत. ते ट्रेलर पाहूनच ओळखतात की चित्रपट कसा असेल. ट्रेलर पाहूनच ते ठरवतात की हा चित्रपट थिएटरमध्ये पहायचा की नाही. आम्ही कितीही प्रमोट केलं तरी थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघणारा प्रेक्षक हा ट्रेलर बघूनच त्याचा निर्णय घेतो की चित्रपट बघायचा की नाही, कधी बघायचा किंवा लोकांच्या प्रतिक्रियांनंतर बघायचा का?” त्याचप्रमाणे केवळ एखाद्या ठराविक स्टारमुळे चित्रपटाला यश मिळतंच असं नाही, हे त्याने स्पष्ट केलं.
View this post on Instagram
“स्टार पॉवर खरंच असेल तर त्यांचे सर्व चित्रपट चालले पाहिजेत. राजेश खन्ना यांचे चित्रपट एका रांगेत हिट ठरले होते. पण एका वेळेनंतर त्यांच्या चित्रपटांना तितका प्रतिसाद मिळत नव्हता. हे आधीपासूनच होत आलंय आणि पुढेही असंच होणार. त्यामुळे आमचं काम इतकंच आहे की चांगले चित्रपट बनवत राहणं”, असं तो पुढे म्हणाला.
श्रेयस लवकरच ‘कर्तम भुगतम’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत विजय राज, मधू शाह आणि अक्षा पर्दासनी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या 17 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी श्रेयला हृदयविकाराचा झटका आला होता. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर श्रेयसने काही काळ ब्रेक घेतला आणि आता तो पुन्हा चित्रपटांमध्ये सक्रिय झाला आहे.