‘श्रीमान श्रीमती’ फेम राकेश बेदी यांची फसवणूक; सैन्यातील जवान असल्याचं सांगून लावला चुना
कॉलद्वारे लोकांचा फसवणूक केल्याच्या अनेक घटना आजवर ऐकायला आणि पहायला मिळाल्या आहेत. अभिनेते राकेश बेदी हे एका अशाच प्रकारच्या फसवणुकीचे शिकार झाले आहेत. याबाबत त्यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. नेमकं काय घडलं, ते सविस्तर वाचा...
मुंबई : 2 जानेवारी 2024 | टेलिव्हिजन आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते राकेश बेदी हे एका फोन स्कॅमचे शिकार झाले आहेत. एका स्कॅमरने फोन कॉलच्या माध्यमातून त्यांची तब्बल 75 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या घटनेनंतर राकेश बेदी यांनी लोकांना सावधान राहण्याचं आवाहन केलं आहे. फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने स्वत:ला सैन्यातील जवान असल्याचं म्हटलं होतं. याप्रकणी त्यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. राकेश यांना फोन करून संबंधित व्यक्तीने त्यांच्याकडून 75 हजार रुपये लुबाडले आहेत. “मी एका मोठ्या फसवणुकीतून वाचलोय. पण लोकांनी अशा स्कॅममध्ये अडकू नये, यासाठी मी आवाहन करतो”, असं ते म्हणाले.
नेमकं काय घडलं?
स्वत:ला भारतीय सैन्यातील जवान असल्याचं सांगत एका व्यक्तीने राकेश यांना कॉल केला होता. त्यांच्या पुण्याच्या फ्लॅट खरेदीत रस असल्याचं संबंधित व्यक्तीने म्हटलं होतं. ती व्यक्ती फसवणूक करणारी होती हे समजेपर्यंत राकेश यांनी त्याला 75 हजार रुपये ट्रान्सफर केले होते. “असे लोक नेहमी रात्रीच्या वेळी कॉल करतात. हे लोक नेहमी रात्रीच्या वेळेस कॉल करतात, जेणेकरून जरी कोणाला फसवणुकीचा संशय आला तरी ती व्यक्ती रात्रीच्या वेळी तक्रार दाखल करू शकणार नाही,” असंही राकेश बेदी म्हणाले.
View this post on Instagram
राकेश यांनी याप्रकरणी पोलिसांना संबंधित व्यक्तीविषयी सर्व पुरावे दिले आहेत. त्याचं नाव, बँक अकाऊंट नंबर, फोटो आणि ट्रान्सॅक्शन डिटेल्स त्यांनी पोलिसांकडे सोपवले आहेत. अशा पद्धतीची फसवणूक गेल्या काही काळापासून होत असल्याचं पोलिसांनी राकेश यांना सांगितलं. मात्र यापुढे अधिकाधिक लोकांची फसवणूक होऊ नये, म्हणून त्यांनी लोकांना याबद्दलची माहिती दिली. राकेश हे गेल्या चार दशकांपासून सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. त्यांनी चश्मेबद्दूर, खट्टामीठा, प्रोफेसर की पडोसन यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय त्यांनी ‘ये जो है जिंदगी’, ‘श्रीमान श्रीमती’ यांसारख्या मालिकांमध्येही काम केलंय. राकेश हे त्यांच्या कॉमिक टायमिंगसाठी खास ओळखले जातात.
राकेश बेदी हे अलीकडेच ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटात झळकले होते. त्यांनी सनी देओलच्या ‘गदर 2’ या चित्रपटातही भूमिका साकारली आहे. राकेश यांनी ‘भाभी जी घर पर है’ आणि ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ यांसारख्या लोकप्रिय कॉमेडी मालिकांमध्येही काम केलं आहे.