वयाच्या पन्नाशीत असलेली सिद्धू मूसेवालाची आई गरोदर; लवकरच देणार बाळाला जन्म
दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाने मनसा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. पंजाब विधानसभा निवडणुकांपूर्वी मूसेवालाने गेल्या वर्षी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राज्य सरकारने सुरक्षाव्यवस्था काढून घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याची हत्या करण्यात आली होती.

पंजाब : 27 फेब्रुवारी 2024 | दिवंगत पंजाबी गायक शुभदीप सिंह सिद्धू अर्थात सिद्धू मूसेवालाच्या कुटुंबात एका चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. मूसेवालाची आई चरण कौर गरोदर असल्याचं कळतंय. सिद्धूच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तीने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सिद्धू मूसेवालाची 29 मे 2022 रोजी मनसा जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरून त्याने मनसा मतदारसंघात पंजाब विधानसभा निवडणूक लढवली होती. सिद्धूच्या हत्येप्रकरणी 31 जणांवर आरोप करण्यात आले होते. ज्यामध्ये गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांचाही समावेश होता. तर आतापर्यंत याप्रकरणात 25 जणांना अटक करण्यात आली आहे.
सिद्धू मूसेवाला हा पंजाबमधील अत्यंत प्रसिद्ध गायक आणि रॅपर होता. तो स्वत:च त्याची गाणी लिहायचा आणि त्यांची निर्मिती करायचा. तो सर्वांत श्रीमंत पंजाबी गायकांपैकी एक होता. सिद्धूच्या निधनानंतरही त्याची गाणी कुटुंबीयांकडून प्रदर्शित करण्यात आली आणि त्यांना सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळाला. सिद्धू मूसेवाला हा एकुलता एक मुलगा होता. त्याचे आई-वडील आता पन्नाशीत आहेत. गरोदरपणाविषयी अद्याप त्याच्या आई-वडिलांकडून कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही.




View this post on Instagram
सिद्धू मूसेवालाची आई चरण कौर या गेल्या सहा महिन्यांच्या अधिक काळापासून मीडियापासून दूर आहेत. त्या लवकरच बाळाला जन्म देणार असल्याचं कुटुंबातील जवळच्या व्यक्तीने सांगितलं आहे. सिद्धूचे वडील बलकौर सिंह हे भटिंडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात अशी चर्चा होती. मात्र राजकारणात प्रवेश केल्यानंतर काहीच बदलणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. तर अलीकडेच चरण कौर यांनी सोशल मीडियाद्वारे ‘दिल्ली चलो’ या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना आपला पाठिंबा दर्शविला होता. खनौरी सीमेवर मारला गेलेला शेतकरी शुभकरण सिंग यांना न्याय देण्याची मागणीही त्यांनी केली होती.
राज्य सरकारने सिद्धू मूसेवालाची सुरक्षाव्यवस्था काढून घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी पंजाबच्या मनसा जिल्ह्यात अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबारात 28 वर्षीय मूसेवालाचा मृत्यू झाला होता. सिद्धू त्याच्या जीपमधून जात असताना अज्ञातांनी त्याच्यावर गोळीबार केला होता. सिद्धूने 2017 मध्ये संगीतविश्वात पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर त्याचे अनेक म्युझिक अल्बम गाजले. ‘लेजंड’, ‘सो हाय’, ‘द लास्ट राइड’ यांसारख्या त्याच्या गाण्यांना चाहत्यांकडून खूप प्रतिसाद मिळाला. सिद्धूच्या मृत्यूनंतर आणखी एक गाणं प्रदर्शित करण्यात आलं होतं. ‘एसवायएल’ या गाण्याने अनेक विक्रम मोडले होते.