Lalbaugcha Raja | प्रचंड गर्दीतून सोनू सूद ‘लालबागचा राजा’च्या दर्शनाला; नेटकरी म्हणाले ‘खरा हिरो’!
अभिनेता सोनू सूदने पत्नीसह लालबागचा राजाचं दर्शन घेतलं. मात्र त्यासाठी त्याने व्हीआयपी एण्ट्री घेतली नाही. सर्वसामान्यांच्या रांगेतून, गर्दीतून तो बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचला होता. हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत.
मुंबई | 27 सप्टेंबर 2023 : लालबागचा राजाचं दर्शन घेण्यासाठी दररोज लाखो भाविक तासनतास रांगेत उभे असतात. सर्वसामान्यांना मुखदर्शनासाठी तीन ते चार तास रांग आणि चरणस्पर्शासाठी जवळपास दहा ते बारा तास रांगेत उभं राहावं लागतं. मात्र सेलिब्रिटींना व्हीआयपी एण्ट्रीद्वारे अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांत लालबागचा राजाचं दर्शन घेता येतं. यावरून सोशल मीडियावर अनेकदा टीका झाली होती. सेलिब्रिटींना वेगळी वागणूक का, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला. मात्र असेही काही सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी व्हीआयपी एण्ट्रीचा स्वीकार न करता सर्वसामान्यांप्रमाणे गर्दीत उभं राहून गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. त्याचाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा व्हायरल होणारा व्हिडीओ अभिनेता सोनू सूदचा आहे. पापाराझींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये सोनू सूद, त्याची पत्नी, अभिनेता शेखर सुमन आणि त्यांची आई, कोरिओग्राफर फराह खान हे सर्वसामान्यांच्या रांगेतून ‘लालबागचा राजा’चं दर्शन घेताना दिसत आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. कमेंटमध्ये अनेकांनी सोनू सूदसाठी खास व्हीआयपी एण्ट्री देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
पहा व्हिडीओ
View this post on Instagram
कोरोना महामारी आणि लॉकडाऊनच्या काळात सोनू सूदने असंख्य लोकांची मदत केली होती. त्यानंतरही त्याने मदतीचा ओघ कायम ठेवला. आजही दररोज त्याच्या घराबाहेर अनेक लोक मदतीसाठी रांग लावतात. सोनू सूद स्वत: त्यांच्या तक्रारी ऐकून जमेल तशी मदत करतो. म्हणून लालबागचा राजाच्या दर्शनासाठी त्याला VIP रांगेतून एण्ट्री द्यावी, अशी मागणी काही नेटकरी करत आहेत.
सोनू सूद आणि शेखर सुमन यांच्यासोबत माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर हिनेसुद्धा व्हीआयपी एण्ट्री न घेता सर्वसामान्यांच्या रांगेतून बाप्पाचं दर्शन घेतलं. मानुषीचाही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ‘गर्दीत उभ्या असलेल्यांना हे माहीत नाही का, की त्यांच्यामध्ये मिस वर्ल्ड उभी आहे’, असा प्रश्न एकाने त्या व्हिडीओवर कमेंट करत विचारला. तर ‘किमान सर्वसामान्यांच्या रांगेतून जाण्याची हिंमत तरी त्यांच्यामध्ये आहे. पण तिला दर्शन मिळालं नसल्याचं पाहून वाईट वाटलं’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं.