‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील जयदीपच्या भावाची ‘रंग माझा वेगळा’मध्ये धमाकेदार एण्ट्री
रंग माझा वेगळा या मालिकेचं कथानक चौदा वर्षांनी पुढे सरकलंआहे. कार्तिकला साक्षीच्या मृत्यू प्रकरणी जबाबदार ठरवत त्याला 14 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. संपूर्ण कुटुंबासाठी हा मोठा धक्का होता.
मुंबई : स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’मध्ये लीप आला असून मालिकेचं कथानक 14 वर्षांनी पुढे सरकलं आहे. या 14 वर्षात बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. साक्षीच्या न केलेल्या खुनाच्या आरोपाखाली कार्तिक 14 वर्षांचा तुरुंगवास भोगून आला आहे. तर दीपिका आणि कार्तिकीही आता मोठ्या झाल्या आहेत. लवकरच या मालिकेत दीपिका-कार्तिकीचा खास मित्र आर्यनची एण्ट्री होणार आहे. अभिनेता मंदार जाधवचा भाऊ मेघन जाधव या मालिकेत आर्यन ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.
या मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना मेघन म्हणाला, “मी हिंदी मालिकांमध्ये बरंच काम केलं आहे. पण माझ्या करिअरची सुरुवात मराठी चित्रपटानेच झाली. रंग माझा वेगळा ही माझी मराठीतली पहिली मालिका आहे. त्यात मी आर्यन ही व्यक्तिरेखा साकारतो आहे. या भूमिकेला दोन छटा आहेत. तो मनाने चांगला आहे मात्र तो एका मिशनवर आला आहे. आर्यन कुणाच्या सांगण्यावरून हे करतोय हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल.”
View this post on Instagram
“माझा भाऊ मंदार जाधव माझ्या या नव्या प्रोजेक्टसाठी खूपच उत्सुक आहे. स्टार प्रवाह वाहिनीसोबत मी काम करावं अशी त्याची इच्छा होती जी आता पूर्ण होतेय. गेल्या काही वर्षात स्टार प्रवाहने ज्या पद्धतीने दर्जेदार मालिका सादर करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे ते वाखाणण्याजोगं आहे. त्यामुळे या प्रवाहात सामील होताना अत्यानंद होत आहे.”
मालिकेत 14 वर्षांचा लीप
रंग माझा वेगळा या मालिकेचं कथानक चौदा वर्षांनी पुढे सरकलंआहे. कार्तिकला साक्षीच्या मृत्यू प्रकरणी जबाबदार ठरवत त्याला 14 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. संपूर्ण कुटुंबासाठी हा मोठा धक्का होता. न्यायालयाच्या निर्णयासमोर दीपाही हतबल झाली होती. या दोघांमधील गैरसमज दूर होऊन त्यांनी आपल्या नात्याची नवी सुरुवात केली होती. मात्र दीपा-कार्तिकचा आनंद नियतीला मान्य नव्हता. त्यामुळे पुन्हा एकदा दोघंही एकमेकांपासून दुरावलेत. दुराव्याच्या याच वळणावर मालिकेचं कथानकही चौदा वर्षांनी पुढे सरकलं आहे. ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.