भारत-पाक युद्धाचे हिरो भैरो सिंह यांच्या निधनावर सुनील शेट्टीकडून शोक व्यक्त; ‘बॉर्डर’मध्ये साकारली होती त्यांचीच भूमिका
भारत-पाक युद्धात 7 तास फायरिंग, 25 पाकिस्तानी जवानांना कंठस्नान घालणारे भैरो सिंह यांचं निधन; सुनील शेट्टीने ट्विट करत लिहिलं..
मुंबई: जे. पी. दत्ता दिग्दर्शित ‘बॉर्डर’ या चित्रपटात अभिनेता सुनील शेट्टीने ज्या नायक भैरो सिंह राठोड (निवृत्त बीएसएफ जवान) यांची भूमिका साकारली, त्यांचं नुकतंच निधन झालं. बॉर्डर सेक्युरिटी फोर्सच्या (बीएसएफ) अधिकृत ट्विटर अकाऊंटद्वारे ही माहिती देण्यात आली. भैरो सिंह यांच्या निधनाच्या वृत्तानंतर सुनील शेट्टीने शोक व्यक्त केला. सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याने त्यांना श्रद्धांजली वाहिली.
सोमवारी बीएसएफकडून भैरो सिंह यांच्या फोटोसह एक ट्विट करण्यात आलं. ‘1971 च्या लाँगेवालाच्या लढाईतील हिरो नायक (निवृत्त) भैरो सिंह राठोड यांच्या निधनावर बीएसएफचे डीजी आणि सर्व रँकच्या अधिकाऱ्यांनी शोक व्यक्त केला. बीएसएफ त्यांच्या शौर्याला, धैर्याला आणि कर्तव्याप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणाला सलाम करते. प्रहरी कुटुंब या कठीण काळात त्यांच्या पाठिशी उभं आहे’, असं ट्विटमध्ये लिहिण्यात आलं होतं.
सुनील शेट्टीने व्यक्त केला शोक
सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ या चित्रपटात भैरो सिंह यांची भूमिका साकारली होती. त्यांच्या निधनावर सुनील शेट्टीने दु:ख व्यक्त केल. बीएसएफच्या ट्विटवर त्यांनी लिहिलं, ‘भैरो सिंह यांच्या आत्म्याला शांती लाभो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो.’
Rest in Power Naik Bhairon Singh Ji. Heartfelt condolences to the family ? https://t.co/5A531HeouG
— Suniel Shetty (@SunielVShetty) December 19, 2022
1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाचे हिरो होते भैरो सिंह
1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान लाँगेवाला इथल्या विलक्षण शौर्यासाठी भैरो सिंह ओळखले जातात. या शौर्यासाठी त्यांना 1972 मध्ये सेना पदक मिळालं होतं. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना उपचारासाठी जोधपूरमधल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 16 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भैरो सिंह यांच्याशी फोनवर प्रकृतीची विचारपूस केली होती. अखेर सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
1971 मधील लाँगेवालाच्या लढाईवर आधारित ‘बॉर्डर’ या चित्रपटात सुनील शेट्टी यांच्यासोबतच सनी देओल, जॅकी श्रॉफ, अक्षय खन्ना, सुदेश बेरी, पुनीत इस्सार आणि कुलभूषण खरबंदा यांनी भूमिका साकारल्या होत्या. तर तब्बू, राखी, पूजा भट्ट आणि शरबानी मुखर्जी यांच्याही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.