गोविंदासोबत घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान सुनिता अहुजाची पहिली पोस्ट; खास व्यक्तीसोबत फोटो शेअर
गोविंदासोबत घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान सुनिताने सोशल मीडियावर पहिली पोस्ट लिहिली आहे. एका खास व्यक्तीसोबत तिने फोटो पोस्ट केला आहे. गोविंदा आणि सुनिता यांच्या संसारात सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

लग्नाच्या 37 वर्षांनंतर अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता अहुजा यांच्या संसारात खटके उडाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. सहा महिन्यांपूर्वी सुनिताने गोविंदाला घटस्फोटाची नोटीस पाठवल्याचा खुलासा मॅनेजरने केला. इतकंच नव्हे तर गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळे राहत असल्याचंही सुनिताने एका मुलाखतीत म्हटलं होतं. या सर्व चर्चांदरम्यान आता गोविंदाच्या पत्नीने सोशल मीडियावर पहिली पोस्ट लिहिली आहे. सुनिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका खास व्यक्तीसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. ही व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून गोविंदा आणि सुनिताचा मुलगा यशवर्धन अहुजा आहे. मुलाच्या 28 व्या वाढदिवसानिमित्त सुनिताने त्याच्यासोबतचा खास फोटो पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
शनिवारी सुनिताने मुलगा यशवर्धनसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहिलं, ‘माझ्या डार्लिंग मुलाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. देवाचा तुझ्यावर सदैव आशीर्वाद राहो.’ या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. गोविंदा आणि सुनिता यांना यशवर्धन हा मुलगा आणि टीना ही मुलगी आहे. मुलांसोबत सुनिता वेगळ्या घरात आणि गोविंदा वेगळ्या घरात राहतात. यासंदर्भातला सुनिताचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. जानेवारीच्या अखेरीस हा व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचं म्हटलं जातंय.




View this post on Instagram
या व्हिडीओमध्ये सुनिता म्हणते, “वेगवेगळे राहतो याचा अर्थ, जेव्हा गोविंदाने राजकारणात प्रवेश केला तेव्हा माझी मुलगी किशोरवयात होती. आमच्या घरात सतत पक्षाचे कार्यकर्ते ये-जा करायचे. घरात किशोरवयीन तरुणी शॉर्ट्समध्ये फिरत असेल तर ते बरं वाटत नाही. म्हणून घराच्या समोरच पक्षाच्या कामासाठी गोविंदाने ऑफिस घेतलं. अनेकदा कामामुळे आणि मिटींग्समुळे गोविंदाला रात्री खूप उशीर व्हायचा. मग तो तिथेच झोपायचा.” या व्हिडीओच्या शेवटी सुनिता असंही म्हणते, “मला आणि गोविंदाला कोणीच वेगळं करू शकत नाही. किसी का माई का लाल तो सामने आ जाए.”
गोविंदाने 2004 मध्ये राजकारणात प्रवेश केला. मात्र 2008 मध्ये त्याने राजकारणातून काढता पाय घेतला. गोविंदा संसदेत सतत गैरहजर असल्याने अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोविंदाने शिवसेनेत प्रवेश केला.