Sunny Deol | बंगल्याच्या लिलावाबद्दल अखेर सनी देओलने सोडलं मौन; चाहत्यांना केली ‘ही’ विनंती
सनी देओलने बँक ऑफ बडोदाकडून कर्ज घेतलं होतं. मात्र त्या कर्जाची परतफेद केली नाही. त्यामुळे त्याच्यावर 56 कोटी रुपयांची थकबाकी होती. त्याच्या वसुलीसाठी 25 सप्टेंबरला सनी व्हिलाचा लिलाव करण्यात येणार होता.
मुंबई | 22 ऑगस्ट 2023 : अभिनेता आणि खासदार सनी देओलच्या जुहू इथल्या बंगल्याचा लिलाव होणार होता. मात्र लिलावाची जाहिरात प्रसिद्ध होताच अवघ्या 24 तासांत रद्द करण्यात आला. बँक ऑफ बडोदाने 56 कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी रविवारी ‘सनी व्हिला’ बंगल्याच्या लिलावासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. मात्र तांत्रिक कारणामुळे लिलाव रद्द करण्यात आल्याचं सोमवारी बँकेनं स्पष्ट केलं. त्याचबरोबर सनी देओल थकीत रक्कम भरणार असल्याने लिलाव रद्द केल्याचंही बँकेकडून सांगण्यात आलं आहे. याप्रकरणी आता सनी देओलची प्रतिक्रिया समोर आली आहे.
सनी देओलची प्रतिक्रिया
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सनी देओल म्हणाला, “आम्ही हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि लवकरच त्यावर तोडगा निघेल. मात्र त्याप्रकरणी कोणतेही अंदाज वर्तवू नका, अशी मी तुम्हाला विनंती करतो.” सनी देओलचा ‘गदर 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. त्यातच रविवार बँक ऑफ बडोदाने जुहू इथल्या त्याच्या बंगल्याच्या लिलावासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीनुसार सनी देओलने घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याने त्याच्या या बंगल्याचा लिलाव करण्यात येणार होता.
बँक ऑफ बडोदाकडून घेतलं होतं कर्ज
सनी देओलने बँक ऑफ बडोदाकडून कर्ज घेतलं होतं. मात्र त्या कर्जाची परतफेद केली नाही. त्यामुळे त्याच्यावर 56 कोटी रुपयांची थकबाकी होती. त्याच्या वसुलीसाठी 25 सप्टेंबरला सनी व्हिलाचा लिलाव करण्यात येणार होता. यासाठी 51 कोटी 43 लाख रुपयांची बोली लावण्यात आली होती. मात्र सोमवारी बँकेकडून एक शुद्धिपत्र प्रसिद्ध करण्यात आलं. या शुद्धिपत्रानुसार हा लिलाव तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आला आहे.
सनी व्हिलाचा लिलाव अचानक रद्द
सनी व्हिलाचा लिलाव अचानक रद्द केल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित याबाबत टीका केली. रविवारी दुपारी लोकांना असं समजलं की बँक ऑफ बडोदाने खासदान सनी देओल यांच्या जुहू इथल्या घराचा ई-लिलाव करणार आहे. सोमवारी सकाळी 24 तासांच्या आत, तांत्रिक कारण देऊन लिलावाची नोटीस मागे घेतली. हे तांत्रिक कारण कुठून आलं, असा सवाल त्यांनी केला.